थंडी पडायला लागली की केस कोरडे होणे, गळणे, चाई पडणे, तसंच त्वचेवर ओरखडे उमटणे, त्वचा काळवंडणे, पापुद्रे सुटणे, भेगा पडणे असे विकार व्हायला सुरुवात होते. या विकारांकडे दुर्लक्ष झालं तर ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात. टक्कल पडू शकतं किंवा त्वचा निस्तेज दिसायला लागते. म्हणूनच या दिवसांत केसांची आणि त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. कशी हे पाहू या. नाही म्हटलं तरी मुंबईत थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अंगाला वारा झोंबू लागला आहे. आता या थंडीत त्यामुळे आता केस कोरडे होणे, गळणे अशा विविध समस्या उद्भवायला लागतील. या सगळ्यापासून बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कोणती तेलं आहेत जी तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी पोषक ठरतील हे जाणून घेऊ या. केसांप्रमाणेच थंडीचा परिणाम त्वचेवरही होताना दिसतो. त्वचा कोरडी होते, ओरखडे उमटतात. भेगा पडतात. इतकंच नाही तर काही जणांची त्वचाही काळवंडते किंवा त्वचेला खाज उठते. अशा या त्वचेचं थंडीपासून संरक्षण करायला हवं. त्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊ या. केसांची काळजी - ज्यांना सकाळी लवकर बाहेर पडायला लागतं त्यांनी केस कव्हर करा. कव्हर करा म्हणजे झाका. बोचरे वारे आणि या वा-यामुळे धुळीचे कण तुमच्या केसांत जाऊन ते खराब होणार नाहीत. आपल्याकडे हॅट घालण्याची पद्धत नाही. त्यामुळे तुमचे केस संपूर्ण झाकतील असे स्कार्फ वापरा.
- आठवडय़ातून एकदा तरी केसांना डीप कंडिशननिंग करा. यामुळे केसांना मॉइश्चर मिळेल. तसंच शॅम्पू केल्यावर केस अतिशय कोरडे होतात. त्यामुळे शॅम्पू केल्यावर केसांना तेल लावावं. म्हणजे त्यांना पोषण मिळेल. आणि ते मऊ आणि चमकदार दिसतील.
- आठवडय़ातून किमान दोन ते तीन वेळा केस शॅम्पूने धुतल्यास कोरडे होण्यापासून वाचतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमचे केस कोरडे असले पाहिजेत. दुसरं असं की ओले राहिले तर तुमच्या केसातलं मॉइश्चर थंड हवेमुळे तिथेच थिजू शकतं. जेणेकरून तुमचे केस कोरडे होणार नाहीत आणि तुटणार नाहीत.
- हिवाळ्यात नियमितपणे म्हणजे दर सहा ते आठ आठवडय़ांनी तुम्ही तुमचे केस ट्रीम करा. म्हणजे केस दुभंगणार नाहीत.
तेल कोणते वापराल? हल्ली केस गळण्याच्या समस्या खूप ऐकायला मिळतात. विशेषत: केस धुताना केस अधिक गळतात. थंडीच्या दिवसात तर ही समस्या अतिशय कॉमन झाली आहेत. केस गळतीमागे विविध कारणं असू शकतात. त्यात आपली बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे केस अधिक गळतात. त्यासाठी आपण कित्येक जाहिरातींना बळी पडतो. आणि तेल विकत आणतो. पण आपल्याकडे अशी काही नैसर्गिक तेलांचे प्रकार आहेत जी नियमित लावली तर आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल. ऑलिव्ह ऑईल- ऑलिव्ह ऑईल गरम करून टाळूवर मसाज करा. एक दोन तास तसंच ठेवा. त्यानंतर केस धुवा. असं केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात. बदाम तेल- बदामात नैसर्गिकरीत्याच डी आणि ई जीवनसत्त्व असतं जे तुमच्या केसांना नैसर्गिकपणे मॉइश्चर देतं. आणि कोरडे किंवा खराब होण्यापासून त्यांचा बचाव करते. म्हणूनच केस धुण्याच्या आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने केसांना मसाज केला तर तुमचे केस मजबूत होतात. खोबरेल तेल- खोबरेल तेल घेऊन त्याने केसांच्या मुळाशी बोटांच्या साहाय्याने मसाज करा. यामुळे खराब झालेले केस किंवा दुभंगलेले केस व्यवस्थित करण्यास मदत करतात. तेल गरम करून टाळूवर लावल्यावर तिथलं रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि केसांना आवश्यक असलेला ऑक्सिजन त्यातून मिळतो. एरंड तेल- आपल्याला माहीत नसतं मात्र एरंड तेल असं तेल आहे जे तुमच्या केसांच्या प्रत्येक समस्येवरील रामबाण उपाय आहे. दररोज केसांच्या मुळाशी लावल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि नैसर्गिकरीत्या केसांना ऑक्सिजन पुरवला जातो. परिणामी केस वाढतात. त्यात जीवनसत्त्व ई आणि ओमेगा ६ नावाचं अॅसिड असल्याने केसांना त्यामुळे मॉइश्चर मिळतं. आणि दुभंगण्यापासून बचाव होतो. कोरफड आणि खोबरेल तेल- कोरफडीत अँटीबॅक्टिरिअल आणि अँटीफंगलचे गुण असतात. ज्यामुळे कोंडय़ापासून बचाव होण्यास मदत होते. म्हणूनच कोरफडीचं गर खोबरेल तेलात घालून ठेवावा. असं हे मिक्स केलेलं तेल टाळूला लावून ठेवावं. अर्ध्या तासानंतर धुऊन टाकावं. म्हणजे चाईचा त्रास होत नाही आणि रक्ताभिसरणही सुरळीत होतं. आवळा आणि खोबरेल तेल- अवळा हे केसांचं टॉनिक असून केसांच्या आरोग्यासाठी हे उत्तम आहे. आवळ्याची पूड खोबरेल तेलात घालून केसांच्या मुळांशी लावल्याने मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ होते. केसांत कोंडा होणे आणि अकाली केस पांढरे होण्यापासून बचाव होतो. चला मग हे उपाय करून बघा आणि केसांची काळजी घ्या. त्वचेची काळजी थंडीच्या दिवसांत त्वचेतील आद्र्रता कमी होते. त्याची ताबडतोब काळजी घेतली नाही तर तिच्यावर सुरुकुत्या पडणे, भेगा पडणे असे विकार व्हायला लागतात. म्हणूनच वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे. - थंडीच्या दिवसांत गरम पाण्याने अंघोळ करावी. चेहरा किंवा हात धुण्यासाठीही गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करावा. गरम पाण्यामुळे त्वचेतील तेल उडून जात नाही.
- चेहरा धुऊन झाल्यावर त्यावर ताबडतोब मॉइश्चर क्रीम लावावं. म्हणजे त्वचा निस्तेज दिसत नाही. त्यामुळे बाथरूममध्ये किंवा वॉशबेसिनवर तुम्ही लावत असलेलं क्रीम आवर्जून ठेवा.
- मॉइश्चरची निवड योग्य करा. ऑईल बेस्ड अर्थात तेलाचं प्रमाण असलेल्यां क्रीमची निवड करा. काही क्रीम्समध्ये पाण्याचा वापर अधिक केलेला आढळतो. काही क्रीम्स पेट्रोलियमचा समावेश अधिक असतो. पण त्याचा वापर सांगाल नाही. कारण त्यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी होते.
- बोच-या वा-यापासून संरक्षण करण्यासाठी हातमोजे किंवा पायमोजांचा वापर करा. कारण उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातला सूर्यही धोकादायकच असतो. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उघडय़ा पडलेल्या भागावर क्रीम लावायला विसरू नका.
- आजकाल स्पार्टेक्सच्या फरशा लावण्याची फॅशन आहे. अशा फरशांवर फिरताना पायांना भेगा पडण्याची शक्यता असते. शक्य असल्यास स्लिपर्स घालाव्यात. झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुऊन त्याला क्रीम लावावं. पटकन अॅब्झॉर्बस होणारं क्रीम लावा. क्रीम लावल्यावर पायात मोजे घालावेत. म्हणजे पायांना ऊब मिळेल. आणि भेगा भरून निघतील. - थंडीच्या दिवसांत मुळातच आपण पाणी कमी पितो आणि कोकाकोला किंवा चहा, कॉफी अशी पेये पिण्याकडे कल वाढतो. पण ही पेय पिण्यापेक्षा गरम पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास शरीरारील आद्र्रता टिकून राहते.
- इतर भागांवरील त्वचेच्या तुलनेत हात, पाय, कोपरं, ढोपरं, घोटे यांच्यावरील त्वचा पटकन कोरडी होते. त्यामुळे रात्री झोपताना या भागांना क्रीम लावून झोपावं. म्हणजे त्या भागांना मॉईश्चर मिळण्यास मदत होईल.
- हिवाळ्यात त्वचा नाजूक असते. तुम्हाला जर सोरायसिस, इसप किंवा अन्य काही त्वचारोग झाले असतील तर तुम्ही अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याला धक्का लागेल असे कपडे तसंच केमिकल असलेल्या डिर्टजट पावडरचा वापर टाळावा. सौम्या प्रतीचं क्लिन्झर्स किंवा मॉईश्चराइझरचा वापर करावा.
- अंतर्बाह्य त्वचेला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. परंतु वर म्हटल्याप्रमाणे थंडीत मुळातच पाणी कमी जातं. म्हणूनच पाणीदार फळांचं सेवन करा. कलिंगड, टरबुज, सफरचंद, संत्र, किवी आदी फळ तसंच सेलरी, टोमॅटो, काकडी, गाजर अशा भाज्यांचा आहारात समावेश करावा. थोडक्यात तुम्हाला अधिकाधिक सी जीवनसत्त्व कसं मिळेल याचा विचार करा. त्याचप्रमाणे ओमेगा-३ ज्यातून मिळतं असे जाड, चरबीयुक्त माशांचं सेवन करा.
- कित्येकदा क्लिन्झर्सचा वापर केला जातो. मात्र क्लिन्झर्समुळे त्वचा अधिकच कोरडी होते. म्हणूनच क्लिन्झर्स लावल्यावर किमान ३० सेकंदांसाठी तसाच ठेवावा. म्हणजे अधिक कोरडेपणा होईल आणि त्यानंतर त्यावर टोनर आणि नंतर मॉईश्चरायझर लावा. म्हणजे कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल.
- घरगुती मॉईश्चरचा वापर करा. मध, योगर्ट, ऑलिव्ह ऑइल्सचा वापर करा. बदामाचं तेल, केळी आणि कोरफड याचं एकत्रित मिश्रण करून ते दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेह-याला लावा. तुम्हाला हव्या त्या गोष्टी एकत्रित करा आणि ते चेह-याला लावा. आणि थोडय़ा वेळाने चेहरा धुऊन टाका. म्हणजे शरीरातील आद्र्रता टिकून राहायला मदत होईल.
- कित्येक जणांना थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याचाही त्रास होतो. केवळ फुटत नाहीत तर कित्येकांच्या ओठांची सालंदेखील निघतात. ते अतिशय खराब दिसतं. ही सालं हळुवारपणे काढायला गेलात तर त्यातून रक्त येण्याची शक्यता असते. म्हणूनच आपल्याजवळ सतत लिपबाम किंवा अन्य मॉईश्चरायझर क्रीम ठेवावं. ओठ कोरडे होण्याचा त्रास असलेल्यांनी ओठांना नियमित क्रीम लावल्यास ओठ फुटणार नाहीत.
|