दिवसभर तीव्र उन्हाचे चटके आणि रात्री जोरदार पाऊस असं काहीसं वातावरण पंधरा दिवसांपासून मुंबईकर अनुभवत आहेत. वातावरणातील या बदलामुळे डिहायड्रेशन, डायरिया, हिट स्ट्रोक अशा विकारांना मुंबईकरांना सामोरं जावं लागत आहे. या तडाख्यातच आजपासून कित्येकांचे उपासही सुरू होतील. त्यातून आणखी उष्णता वाढेल. या उष्णतेपासून आपल्या शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. शरीराचं तापमान संतुलित राखणा-या पदार्थाची माहिती- उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. परतीच्या पावसाने तर मुंबईकरांची चांगलीच दैना उडवली. दिवसभर तीव्र उन्हाचे चटके आणि रात्री जोरदार पाऊस असं काहीसं वातावरण पंधरा दिवसांपासून मुंबईकर अनुभवत आहेत. वातावरणातील या बदलामुळे डिहायड्रेशन, डायरिया, हिट स्ट्रोक अशा विकारांना मुंबईकरांना सामोरं जावं लागत आहे. त्यात घाम येणं, त्वचा काळवंडणं, थकवा जाणवणं, भूक न लागणं, उलटी होणं किंवा फूड पॉईझनिंग होणं अशा विकारांनाही ते बळी पडतायेत. म्हणूनच या उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी तुम्ही स्वत:च्या आरोग्याची काळजी करणं आवश्यक असतं. त्यासाठी तुम्ही खाण्यापिण्यावर लक्ष ठेवायला हवं. तुम्ही खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतली तरच तुम्ही शरीराचं संतुलन राखू शकता. मसालेदार पदार्थाऐवजी लो कॅलरीज असलेल्या पदार्थाना प्राधान्य द्यायला हवं. ज्या पदार्थामध्ये फायबर, कॅल्शिअमचं प्रमाण असतं. या ऑक्टोबर हिटमध्येच नाही तर एकंदरीतच शरीराचं आरोग्य नीट राखायचं असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे, असं नेहमीच सांगितलं जातं. याशिवाय या उन्हापासून वाचण्यासाठी कोणत्या पदार्थाचं सेवन केलं पाहिजे हे जाणून घेऊ या. दही किंवा योगर्ट दही हा अतिशय उत्तम पर्याय आहे. मग तुम्ही ते दही, ताक, लस्सी, रायता किंवा कोशिंबीर अशा कोणत्याही प्रकारात सेवन करा. ते तुमच्या शरीरासाठी चांगलंच असतं. भाज्यांबरोबर दही एक उत्तम काम करतं. दहय़ाचं नियमित सेवन करणं आवश्यक असतं. कारण ते शरीराला थंड ठेवतं. त्याचप्रमाणे त्वचेवरचे डाग कमी होण्यास मदत होते. नारळ पाणी नारळ पाण्यात साखर, इलेक्ट्रोलाईट्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे शरीराला हायड्रेट राहतं. यात पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असतं. शरीराचं तापमान थंड ठेवण्यास मदत करतं. वजन कमी करण्यासाठीही हे अतिशय फायदेशीर असतं. पुदिना उन्हाळ्यासाठी हे अतिशय उत्तम टॉनिक आहे. पुदिन्याची चटणी करून खा किंवा दहय़ासोबत याचं सेवन करा. फायदेशीर ठरतं. हिरव्या भाज्या उष्ण वातावरणात हिरव्या भाज्यांचं सेवन अधिक केलं पाहिजे. कारण यात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. मात्र या भाज्या अधिक प्रमाणात शिजवू नये. कारण असं केल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. काकडी, हिरवा टोमॅटो, भेंडी, आदी भाज्या आणि खरबूज, टरबूजसारखी तसंच त्या ऋतूत मिळणा-या फळांचं सेवन केलं पाहिजे. कांदा सध्या कांदा महागला असून तो खाण्याचे वांदे झाले असले तरीही या दिवसांत कांद्याचं सेवन करणं उत्तम असतं. यात शरीराचं तापमान थंड ठेवण्याचे गुणधर्म आहेत. हा कांदा कच्चा खाल्ला तरीही उत्तम आणि अन्य कोणत्या पदार्थाबरोबर म्हणजे आमटी, चटणी किंवा दह्यासोबत सेवन केलं तरी शरीराला त्याचा फायदाच होतो. सतत लघवी होण्यापासूनही कांदा बचाव करतो. थंडगार सूप ताज्या भाज्यांचं सूप करून ते थंड करून प्यावं. त्यातून शरीराला आवश्यक ती पोषक तत्त्वं मिळतात. जीवनसत्त्वं आणि खनिजंही मिळतात. शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा यातून प्राप्त होते. ज्यूसेस या दिवसांत लिंबूपाण्यासारखा अन्य कोणताही ज्यूस नाही. याशिवाय संत्रं, मोसंब यासारखे ज्यूसही उत्तम आहेत. याचं कारण म्हणजे यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. ज्यातून शरीराला आवश्यक तेवढं पाणी मिळतं. भर उन्हातही तुम्हाला ऊर्जा मिळते. थोडक्यात काय तर उन्हाळ्यात अशा पदार्थाचं सेवन करणं आवश्यक आहे, जे पचण्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागेल. पोटाला तडस लागणार नाही असे पदार्थ सेवन करावेत. कारण असे पदार्थ सुस्ती आणतात. पराठे, जंक फूड, पिझ्झा बर्गर आदी पदार्थाचं सेवन न करणंच उत्तम. अति थंड पदार्थाचं सेवन करणंही टाळावंच. कारण त्यामुळे शरीराला नुकसानच अधिक होतं. टिप्स - भरपूर पाणी प्यावं.
- कॅफिनयुक्त किंवा अल्कोहोलिक पदार्थाचं सेवन करणं टाळावं.
- अधिक थंड पाण्याचं सेवन करू नये.
- पचायला हलकं, पोषक आणि फॅट्सविरहित म्हणजे रसदार फळांचं आणि भाज्यांचं सेवन करावं.
- ड्रायफ्रूट्सचं सेवनही मर्यादित ठेवावं.
- गरम, मसालेदार, भाजलेले किंवा खारट पदार्थाचं सेवन टाळावं. यामुळे अपचन होतं. पचनक्रियेला नुकसान होतं.
- फळं आणि ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.
- नासलेले किंवा बराच काळ फ्रीजबाहेर ठेवलेल्या अन्नपदार्थाचं सेवन करू नये.
- या दिवसांत सकाळची न्याहारी अजिबात टाळू नये.
- बाहेरचे उघडय़ावरचे पदार्थ खाणं टाळावं. हॉटेलमध्ये गेल्यावरही हेल्दी आणि ताजे पदार्थ निवडावेत.
- तुलसी, पुदिनासारख्या हर्बल वनस्पतींना आहारात समाविष्ट करा. त्यामुळे प्रकृती थंड राहील.
उपास असलेल्यांसाठी ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच जाणवतो आहे, त्यात आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यात कित्येक जणांचे उपास असतील, यामुळे या दिवसांत आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. उपवास न खाता करण्यापेक्षा या दिवसांत पातळ पदार्थ ताक किंवा लस्सी, दूध अशा पदार्थाचं सेवन अधिक ठेवा. ताजी फळं किंवा त्या फळांचे ज्यूसेस अतिशय चांगलं ठरतील. वरीचा भात, साबुदाणा या पदार्थाचं प्रमाण कमी करावं. योग्य प्रमाणात शरीराला काबरेहायड्रेट्स मिळतील, याकडे लक्ष द्यावं. कारण या दिवसांत चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच उपवासाच्या दरम्यान दहय़ाचं सेवन अवश्य करा. |