सोयीस्कर आणि पटकन मिळणा-यां जंक फूडच्या आहारी शहरातला तरुण वर्ग दिवसेंदिवस वळत आहे. मात्र त्यामुळे हृदयविकारासारख्या परिणामांना सामोरं जावं लागतं, याबद्दल लोक अनभिज्ञ आहेत. लोकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण होऊन आपले कर्मचारी निरोगी राहावेत, यासाठी बहुतेक ऑफिस आणि कॉर्पोरेट्समध्ये कामाच्या ठिकाणी व्यायाम आणि आरोग्यदायी आहार या गोष्टीवर विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. आजच्या हृदयदिनाच्या निमित्ताने त्याविषयी थोडं जाणून घेऊ या. मृणाल अवघ्या तिशीतली मुलगी.. अतिशय हुशार, पण जंक फूड खाल्ल्यामुळे तिचं वजन वाढत चाललं होतं. पण त्याकडे तिचं दुर्लक्ष होत होतं. सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे अवघ्या तिशीत तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. ही काही मृणालचीच समस्या नाही. हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणा-यां तरुण स्त्री-पुरुषांच्या मृत्यूबद्दल आपण सातत्याने ऐकत असतो. शहरी भागात अशा प्रकारच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. काही पिढयांपूर्वी पन्नाशी किंवा साठीतील पुरुषांना हृदयविकार व्हायचा. आता मात्र स्त्री-पुरुषांना तिशी-चाळिशीतच या विकाराचा त्रास होताना दिसत आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर डिझिजेस(सीव्हीडी)चे प्रमाण वाढत असण्यामागे प्रामुख्याने दिसणारी कारणं म्हणजे ताण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी. आज शहरी तरुण (स्त्री व पुरुष) काम, आरोग्य, आर्थिक परिस्थिती, समाज, इतरांशी तुलना यातून येणा-यां प्रचंड तणावाखाली असतात. त्याला खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नाची जोड मिळते. त्यामुळेच शहरी तरुणाईला सीव्हीडी आणि हृदयविकाराच्या झटक्यांचा त्रास होत आहे. बैठय़ा जीवनशैलीचा हा चुकीचा परिणाम होत आहे, असं म्हणता येईल. बहुतेक ऑफिस आणि कॉर्पोरेट्समध्ये आपले कर्मचारी निरोगी राहावेत यासाठी कामाच्या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहेत. कॉर्पोरेट्स आपल्या कर्मचा-यांना योग, एरोबिक्ससारख्या उपक्रमांमध्ये गुंतवत आहेत, तसंच आहारतज्ज्ञांची नेमणूक करून त्यांच्याद्वारे कर्मचा-यांना खाण्याच्या आरोग्यदायी सवयींविषयी मार्गदर्शनही करत आहेत. सध्या विविध कार्यालयांमध्ये शारीरिक व्यायाम आणि आरोग्यदायी आहार या गोष्टी सीईओ आणि टीम लीडर्सच्या प्राधान्यक्रमावर अग्रणी आहेत. मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक व्हीडिओ फिरत होता. त्यात ऑफिसमधलं काम सुरू करण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटं सगळे कर्मचारी त्यांच्या आवडीच्या गाण्यांवर थिरकत होते. कामाला सुरुवात होण्यापूर्वी सगळं विसरून मुख्य म्हणजे शरीराला ऊर्जा मिळून ते काम करतील असा हेतू त्यामागे होता. थोडक्यात कर्मचा-यांच्या मानसिक संतुलनासाठी केलेला तो प्रयोग होता. त्यांना त्यांच्या ताणातून बाहेर काढण्याचा तो एक मार्ग त्या कंपनीला सुचला असावा. आज अन्नाचा दर्जा खालावत असून फास्ट फूड तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. पूर्वी ४५ ते ६० वर्ष वयोगटामध्येही हृदयविकार किंवा सीव्हीडी ही खूप मोठी घटना समजली जायची, मात्र आता हा वयोगट २५ ते ३५ वर्षादरम्यान आला आहे. शिवाय, आधुनिकीकरण, स्वयंचलित यंत्रांमुळे शारीरिक हालचाल पूर्णत: बंद झाली आहे. आता दुर्दैवाने पळणे, सायकल चालवणे किंवा चालण्यासारखे व्यायाम विशेषत: तरुण पिढीमध्ये फारसे दिसून येत नाहीत. भरपूर ट्रान्सफॅट आणि रिफाईंड साखरेचा समावेश असलेले व सहजपणे उपलब्ध होणारे जंक फूड हे हृदयविकारामागचे प्रमुख कारण आहे. शहरी कर्मचारीवर्गाला जंक फूडची (फ्रेंच फ्राईज, तळलेले खाद्यपदार्थ) प्रचंड सवय झाली आहे, कारण ते सोयीस्कर व पटकन मिळणारे आहे, मात्र त्याच्या हृदयविकारासारख्या परिणामांबद्दल लोक अनभिज्ञ आहेत. एका अभ्यास अहवालानुसार ग्रामीण भारतात व्यक्तिगणिक फॅट्सचे सेवन ९ ते २२ ग्रॅम आहे, तर शहरी भागांत हेच प्रमाण २५ ते ४५ ग्रॅम असून ते अतिशय धोकादायक आहे. आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी ट्रान्सफॅट्स आणि रिफाईंड साखर (बेकरी उत्पादने व जंक फूड) यांचे प्रमाण कमी केले पाहिजे. त्याशिवाय, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करण्यानेही हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. अमेरिकेतील वैज्ञानिक अभ्यासानुसार दररोज दहा हजार पाय-यां चालल्यास हृदयविकार किंवा सीव्हीडी होण्याचं प्रमाण खूपच कमी होतं. दैनंदिन जीवनात केलेल्या थोडय़ाशा बदलामुळे दीर्घायुष्य जगण्यावर तसेच हृदय निरोगी राहण्यास मदत होते. सातत्याने तपासणी व मूल्यांकन केल्यास कामाचं ठिकाण निरोगी राहण्यास चालना व पाठिंबा मिळेल. |