कित्येकदा आपण विद्यार्थ्यांना अन्नबाधा झाली अशा प्रकारच्या बातम्या ऐकतो किंवा वाचतो. ही अन्नबाधा होते म्हणजे नेमकं काय होतं? त्याची लक्षणं काय आहेत, त्यावर काय उपचार करावेत हे जाणून घेऊ या. संगीताला त्या दिवशी ऑफिसमध्ये कामानिमित्त उशिरापर्यंत थांबावं लागणार होतं. मात्र संगीताला भूक लागली होती. ही भूक काही शमणारी नव्हती आणि कामाला किती उशीर होईल हे तिला माहीत नव्हतं. उशिरापर्यंत थांबणार असल्याने तिने काहीतरी खायचं ठरवलं. म्हणून तिने भेळ मागवली. तिखट, चमचमीत भेळेने तिची त्या दिवशीची भूक शमली खरी पण दुस-या दिवशी मात्र तिला जुलाब आणि उलटया होऊन तिची प्रकृती खालावली. त्या दिवशी घरगुती उपचार घेऊनही तिला बरं वाटेना. शेवटी डॉक्टरांकडे गेली. दोन दिवस डॉक्टरांकडचं औषध घेतल्यानंतर तिला कुठे थोडं बरं वाटलं. केवळ संगीताच नाही तर आपल्यालाही असं कित्येकदा होतं. अगदी बाहेच्याच नाही तर एखादा पदार्थ आपण गरजेपेक्षा अधिक सेवन केल्यास किंवा कोणत्या पदार्थाची अॅलर्जी असल्यास घरी केलेल्या पदार्थामुळेही अन्नबाधा होऊ शकते. ही अन्नबाधा नेमकी कशामुळे होते हे जाणून घेऊ या. कित्येकदा भूक लागली म्हणून कितीही नाही म्हटलं तरीही आपण ऐन वेळी लागलेल्या भुकेसाठी बाहेरच्या खाद्यपदार्थानाच प्राधान्य देतो. बाहेर खाताना आपण अधिक लक्ष देत नाही. मग नेहमीच्या आहारापेक्षा आपण काही उलट-सुलट खाल्लं तर चुकीच्या पद्धतीमुळे अन्नाची विषबाधा होऊ शकते. यालाच फूड अॅलर्जी असंदेखील म्हणतात. आपल्याला विषबाधा झाली आहे हे कधी कधी लगेचच समजतं किंवा मग उशिरा समजतं. या अन्न विषबाधेमुळे कधी कधी चुकीचा अन्नपदार्थ सेवन केल्यावर लगेचच पोटात दुखतं, उलटी होते असं वाटायला लागतं. ही विषबाधा कधी कधी जीवावर बेतू शकते. एका संशोधनानुसार ही अन्नाची विषबाधा साधारण ज्येष्ठ मंडळी किंवा लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. मात्र सध्याची चुकीची आहारपद्धती पाहता ही विषबाधा तरुणांमध्ये अधिक आढळून येते. ही विषबाधा का होते याची कारणं पुढीलप्रमाणे - कारणं खरं म्हणजे अन्नबाधा नेमकी कशामुळे झाली याचं काही ठोस कारण आपण सांगू शकत नाही. पण गुणसूत्रांमध्ये बदल किंवा वातावरणातील काही बदल आपण सेवन केलेल्या अन्नात अडथळा आणू शकतात. म्हणूनच पावसाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंमध्ये ही विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते. कारण उन्हाळ्यात बाहेरच्या प्रखर उन्हामुळे खाद्यपदार्थावर परिणाम होण्याची शक्यता असते आणि पावसाळ्यात मुळातच वातावरणात कित्येक बदल झालेले असतात. त्यात सगळीकडे माशा घोंगावत असतात. रोगराईने अक्षरश: थैमान घातलेलं असतं. या सगळ्याचा परिणाम खाद्यपदार्थामुळे होतो आणि असे खाद्यपदार्थ आपल्या पोटात गेल्यास आपल्याला विषबाधा होऊ शकते. म्हणूनच तज्ज्ञ तुम्हाला पावसाळ्यात पचायला हलका आहार घ्या असा सल्ला देतात. मात्र वरवर वाटणारी ही समस्या कधी कधी गंभीर रूपही धारण करू शकते. अन्नबाधा झाली आहे हे आपल्याला पुढील काही लक्षणांवरून दिसून येतं. लक्षण » डोकं गरगरणे » पोटात दुखणे » चेहरा, ओठ, जीभ किंवा डोळे सुजणे » डायरिया किंवा जुलाब होणे » उलटया होणे » अंगाला खाज सुटणे » घशात खवखव होणे » श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होणे उपाय काय कराल? » सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे जे पदार्थ पचायला जड असतात किंवा ज्या पदार्थाची आपल्याला अॅलर्जी असते असे पदार्थ सेवन करणं टाळावं. अॅलर्जीचा त्रास असलेल्यांनी चणे, कडधान्य या पदार्थाचं सेवन टाळावं. » बाहेर जेवायला गेल्यावरही आपल्याला कोणत्या पदार्थामुळे त्रास होतो हे लक्षात असू द्यावं. असे पदार्थ टाळावे. उगाचच अशा पदार्थाचं सेवन करून आजारांना निमंत्रण देऊ नये. » मुळात अॅलर्जी असलेल्या माणसांना अन्नबाधा पटकन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. » कधी कधी केवळ बाहेरच्याच कारणांमुळेच नाही तर काही अंतर्गत लपलेल्या कारणांमुळेही अन्नबाधा होऊ शकते. ही अंतर्गत कारणं कोणती आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. » अंडी, दूध, शेंगदाणे, मासे, कडधान्य, गहू असे पदरथ अन्नबाधेला कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच अशा पदार्थाचं सेवन करताना विशेष काळजी घ्यावी. त्वरित उपचार काय करावेत? काही माणसांना पटकन डॉक्टरांकडे जाणं आवडत नाही. अशा वेळी ते घरगुती उपचार करत बसतात. दुस-या दिवशी डॉक्टरांकडे जातात. मात्र अन्नबाधा झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावं. कारण अँटीबायोटिकचा समावेश शरीरात झाला की अॅलर्जीचं प्रमाण कमी होतं. कारण योग्य वेळी उपचार न केल्यास अन्नबाधेमुळे संपूर्ण शरीराचं कार्य बिघडू शकतं. अस्थमा, एक्झिमा आणि अन्य काही आजार त्यातून डोकं वर काढू शकतात. आणि दुर्लक्ष झाल्यास कधी कधी मृत्यूही ओढवू शकतो. |