आला पावसाळा तब्येत सांभाळा असं सर्रास म्हटलं जातं. पण तब्येत सांभाळा म्हणजे नेमकं काय? किंवा तब्येत सांभाळण्यासाठी आपण काय खावं आणि खाऊ नये हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्यावरच आपल्या आरोग्याचं गणित अवलंबून असतं. बाहेर मस्त पाऊस पडायला लागला की आपल्याला चमचमीत खाण्याचे वेध लागतात. मग घरात आईला किंवा बायकोला गरमागरम भजीची किंवा वडय़ांची, ब्रेड पॅटिस किंवा अन्य कोणत्या पदार्थाची फर्माईश केली जाते. ऑफिसमध्ये असू तर ऑफिसच्या बाहेर मिळणा-या वडे-भजींवर ताव मारला जातो. मात्र अशा पदार्थामुळे वात निर्माण होण्याची शक्यता असते. घरात आपण आपल्या खाण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची काळजी घेतोच. मात्र घराबाहेर पडलेल्या किंवा ऑफिसमध्ये जाणा-या मंडळींना ते शक्य होतंच असं नाही. मग बाहेरच्या पदार्थावर ताव मारला जातो आणि मग विविध आजारांना आमंत्रणच मिळतं. म्हणूनच घराबाहेर पडणा-या मंडळींनी नेमकी कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊ या. काय टाळाल आणि काय खाल? » सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसमध्ये घरातून जेवणाचा डबा घऊन जाणं आवश्यक आहे. बाहेर मिळणारे विविध चॅटचे प्रकार, फास्ट फूड, सँडविचेस, फ्रूट ज्युस आपल्याला भुरळ घालतात खरे, पण ते खाणं शक्यतो टाळावंच. तसंच रस्त्यावर मिळणारं ताक, लिंबूपाणी, गोळा, कुल्फी घेणं टाळावंच. कारण या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने तितक्याशा सुरक्षित नसतात. किंवा त्या करताना तितकीशी काळजी घेतली जात नाही. » या दिवसांत कच्चे पदार्थ टाळावेत. उदाहरणार्थ, भाज्यांचे सलाड. कच्च्या भाज्या खाण्यापेक्षा तेलावर फ्राय केलेल्या भाज्या खाव्यात. » सगळी फळं आणि भाज्या पाण्याने व्यवस्थित धुवाव्यात. विशेषत: पालेभाज्या आणि फ्लॉवर. या भाज्या चार ते पाच पाण्यात स्वच्छ धुवाव्यात. म्हणजे त्याला लागलेली माती निघून जाते. कारण या भाज्या आपण रस्त्यावरून आणतो. » गरज असेल तितकंच खा. कारण या दिवसांत पचनक्रिया मंदावते. म्हणूनच गरजेपेक्षा अधिक पदार्थ खाऊ नका. » शक्यतो गरम पदार्थच खावेत. तसंच पुदिना किंवा आल्याचं आहारात समावेश करावा. आल्याचा चहा या दिवसांत खूप चांगला असतो. » नैसर्गिक आंबट पदार्थाचा आहारात समावेश करावा. उदाहरणार्थ चिंच, लिंबू, पातळ ताक आणि कोकम यांचा सूप, सार, आमटी किंवा भाज्यांमध्ये याचा समावेश करावा. » मूगडाळ ही पचायला चांगली असते. म्हणूनच मुगाच्या डाळीची खिचडी किंवा वरण यांचा आहारात समावेश करा. » आलं, मिरी, लसूण, हिंग, सुंठ, हळद, कोथिंबीर, जिरं यांसारखे पदार्थ तुमची पचनशक्ती सुधारते. » भेंडी, दुधी, पडवळ, सुरण, भाजलेली वांगी किंवा कारली यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. » डाळिंब, चिकू, केळी आणि स्ट्रॉबेरी ही फळं पावसाळ्यात आवर्जून खावीत. तसंच दोन खारीका दररोज खाव्यात म्हणेज तुमच्या शरीराला आवश्यक असणारं लोह आणि ऊर्जा त्यातून मिळते. » मांसाहारी पदार्थ खाणा-यांनी करी किंवा रश्श्याचे पदार्थ खाण्यापेक्षा सूप्सला प्राधान्य द्यावं. » थोडक्यात तुरट, कडवट किंवा तिखट पदार्थ खाणं कधीही चांगलं असतं. » केवळ उकळलेलं आणि गाळलेलं पाणी प्यावं. ऑफिसला येणा-यांसाठी खास डाएट ऑफिसला जाणा-या मंडळींची घर आणि ऑफिस अशी नेहमीच तारेवरची कसरत असते. अशा वेळी डाएटकडे दुर्लक्ष केलं जातं. आपलं डाएट नियंत्रित ठेवणं हे ऑफिसला जाणा-यांसाठी तारेवरची कसरत असते. प्रत्येक वेळी त्यांना हेल्दी फूड घेणं जमेलच असं नाही. त्यामुळे पावसाळ्यात अधिकाधिक नोकरदार मंडळी आजारी पडताना दिसतात. कारण बाहेरचं वातावण बदललेलं असतं. त्यात ते योग्य आहार घेत नाहीत आणि कामाच्या नादात खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होतं, परिणामी आजारी पडतात. म्हणूनच काही गोष्टींचं पालन केलं तर आपलं आरोग्य ते चांगलं राखण्यास मदत करू शकतात. न्याहारीत काय घ्याल? » भरडलेल्या मिक्स धान्याची भाकरी किंवा पोळी, गव्हाचा ब्रेड, ओट्स, मोड आलेले मूग, उकडलेलं किंवा फ्राय केलेलं अंडं. दुपारचं जेवण » चपाती, इडली किंवा सोयाबीन सूप » भाज्या, डोसा किंवा गव्हाचा ब्रेड » डाळ किंवा सांबार किंवा ग्रील्ड चिकन » परतवलेल्या हिरव्या फळभाज्या संध्याकाळची न्याहारी » केळ / संत्र/ लिंबू/ बदाम किंवा भाजलेले चणे रात्रीचं जेवण » पोळी आणि रस्सा भाजी किंवा चिकन रस्सा » गार्लिक ब्रेड किंवा भात » परतवलेल्या हिरव्या भाज्या » डाळ किंवा दही सध्याच्या घडीला आपण आपल्या आहाराबाबत खूपच सतर्क झालो आहोत. आपण ज्या आजारांना तोंड देतो त्यातले कित्येक आजार हे आपण जे पदार्थ सेवन करतो त्यामुळेच होत असतात. म्हणूनच पावसाळ्यात आपण योग्य तो आहार घेतलाच पाहिजे. संतुलित आहार घ्यावा. तसंच आपल्यासोबत योग्य तो आहार बरोबर ठेवावा. कुजलेले, वास येणारे किंवा किडे पडलेल्या पदार्थाची ताबडतोब विल्हेवाट लावावी. जेवण्यापूर्वी किंवा काहीही खाताना इतकंच नव्हे कोणत्याही पदार्थाला हात लावताना प्रथम हात धुवावेत. कारण पावसाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने ठेवलेली स्वच्छता आजारांशी दोन हात करायला मदतच करते. |