उन्हाळा सुरू झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार संभवतात. यात प्रामुख्याने त्वचाविकार, उष्माघात आणि नाकातून होणा-या रक्तस्रवाचा समावेश होतो. या विकारांपासून वाचण्यासाठी थोडीशी दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधनं ठेवली तर परिणाम खूपच सकारात्मक होतात. उन्हाळ्यात होणारे काही आजार व त्यांची कारणं खालीलपैकी सांगता येतील. उष्णतेमुळे होणारे आजार : उष्माघात, सतत होणा-या उलटय़ा, नाकातून होणारा रक्तस्रव आणि सूर्यप्रकाशातील उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी त्वचेवरील परिणाम : सूर्यप्रकाशामुळे होणारा त्वचेचा क्षोभ, त्वचा काळवंडणे, अकाली वृद्धत्व डोळ्यांवरील परिणाम : मोतीबिंदू, डोळ्यांचा दाह, रेटिनाला होणारे नुकसान डासांमुळे होणारे आजार : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया पाण्यामुळे होणारे आजार : अतिसार, आमांश, विषमज्वर, कॉलरा, कावीळ, यकृतावरील सूज, जंताचा प्रादूर्भाव उन्हाळ्यामध्ये साधारणपणे : सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे 'उष्माघात' होय. यालाच 'उन्हामुळे येणारी तिरमिरी'देखील म्हणतात. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याचीदेखील शक्यता असते. धोक्याचे घटक = उष्माघात हा प्रामुख्याने वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणा-या लोकांमध्ये आढळतो. = अर्भकं व चार वर्षापर्यंतची लहान मुलं, पासष्टीच्या पुढील वृद्ध मंडळी यांना उष्माघाताचा त्रास अधिक सहजपणे होऊ शकतो. = तसेच हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनादेखील उष्माघाताची लागण सहज होऊ शकते. उष्माघाताची कारणे उष्माघाताचा संबंध तापमानाबरोबरच वातावरणातील आद्र्रतेशी असतो. वातावरणात आद्र्रता जास्त असली तर उष्माघाताची शक्यता अधिक असते. सर्वात उच्च ताप (सामान्यत: उष्णतामान १०५ अंश फॅरनहाइट) मळमळ, डोकेदुखी, धाप लागणे, धडधड होणे, गोंधळ उडणे, मूच्र्छा येणे, शरीराची निश्चेष्ठता. काळजी कशी घ्याल? उन्हाळ्यात होणारे वरील सर्व आजार आणि प्रामुख्याने होणारा उष्माघाताचा त्रास आपण टाळू शकतो, मात्र त्यासाठी आपल्याला थोडी काळजी घ्यायला हवी. जेव्हा वातावरणातील तापमान खूप वाढू लागतं, तेव्हा शक्यतोवर उन्हात बाहेर फिरणं टाळावं. विशेषत: सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते. बाहेर जाण्याचे टाळणे शक्य नसल्यास मात्र खालील बाबींवर लक्ष द्यावं - भरपूर प्रमाणात पाणी प्यावं उन्हाळ्यात तापमानवाढीबरोबरच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. तहान लागण्याची वाट न पाहता दररोज ८ ते १० ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, निंबूपाणी तसेच ओआरएस पावडर घ्यावी अथवा जवळच बाळगावी. साखरेचे वा अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली पेये घेऊ नयेत. त्यामुळे खरोखरच शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. तसंच बाहेरील थंड पेय घेणं टाळा. ज्यामुळे पोटपेटके सुरू होतात. निरोगी शरीरासाठी नियमित व्यायाम आवश्यकच आहे, मात्र व्यायाम करताना थोडी जास्त काळजी घ्यावी. व्यायामाच्या दोन तास आधी सामान्यत: २४ टक्के द्रवपदार्थ घ्यावेत. व्यायाम सुरू करण्यापूर्वी ८ टक्के द्रवपदार्थाचं सेवन करावं. खाण्याच्या सवयी ताजी फळं तसंच फळभाज्यांचा वापर करावा. गरम तसंच जड अन्नपदार्थ टाळावेत. कारण ते शरीराचे तापमान वाढवतात. टरबूज, द्राक्षं, अननस, गाजर व काकडी खावी. कच्चा कांदा जेवणात असल्यास उत्तम. जेवणामध्ये गरम मसाले, लाल पावडर व मिरची मसाला वापरणे शक्यतो टाळावं. कारण त्यामुळे शरीरातली उष्णता वाढण्यास हातभार लागतो. तसंच तेलकट व तिखट खाणं टाळावं. उन्हाळ्यात घालायचा पेहराव शक्यतोवर हलके, फिकट रंगाचे सैल कपडे परिधान करावे. गडद रंगाचे कपडे घालू नये. जमल्यास पांढ-या रंगाचे कपडे परिधान करावेत. कारण गडद रंग तुलनेने जास्त उष्णता शोषून घेतो. जमल्यास टोपी किंवा स्कार्फ वापरावा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स वापरावेत. त्वचेची घ्यावयाची काळजी त्वचा सजलित ठेवावी तसंच मॉईश्चराझरचा वापर करावा. बाहेर जावंच लागलं तर स्कार्फ (मुली) तर टोपी (मुले)चा वापर करावा. छत्रीचा वापर करावा. बाहेर जाण्यापूर्वी तीस मिनिटं आधी सनस्क्रीन लोशन लावावं. तसंच ते पॅकेटवरील दिलेल्या सूचनेबरहुकूम वापरावं. घरात काय बदल कराल दारं व खिडक्या बंद ठेवावीत. घरातील पडदे गडद रंगाचे नसावेत. खिडक्यांच्या काचा गडद रंगांच्या असाव्यात. म्हणजे सूर्यप्रकाश आतमध्ये येणार नाही. खिडक्या रात्री उघडय़ा ठेवाव्यात आणि घरात हवा खेळती ठेवावी. घराच्या आजूबाजूला झाडे असावीत. हिरवळ असावी जेणेकरून वातावरण थंड राहण्यास मदत होते. डासांच्या उपद्रवासंबंधी घ्यायची काळजी डासांची प्रजनन ठिकाणी म्हणजे घरातील व बाहेरील सांडपाणी तुंबून राहिलेली ठिकाणं, घरातील कुंडय़ांमधील पाणी यासारखी ठिकाणं स्वच्छ ठेवावीत. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. डासांना दूर ठेवण्यासाठीच्या औषधांचा, स्प्रेचा वापर करावा. जेणेकरून डासांपासून प्रादुर्भाव होणारे आजार टाळता येतील. पाण्यात होणा-या जंतूंचा प्रादुर्भाव आणि त्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्याल? = पाश्चराईज्ड दूध आणि उकळलेलं पाणी वापरावं. उष्णतेमुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात. = हात स्वच्छ धुवावेत. = घरात शिजवलेले अन्नपदार्थ खावेत. = शिळे अन्न खाऊ नये. = लहान मुलांना शक्यतोवर बाटलीमधून दूध देऊ नये. उष्माघातावर त्वरित उपचार कसा कराल? आपल्या आजूबाजूला कोणाला उष्माघाताचा झटका आला वा त्रास होऊ लागला तर त्वरित दवाखान्यात नेण्यासाठी अॅम्ब्युलन्सला (९११ ला) फोन करावा आणि मध्यंतरीच्या काळात पुढीलप्रमाणे प्रथमोपचार करावेत. = सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावं आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्णतापमान कमी होण्यास मदत होते. = शरीराला ओल्या कपडय़ाने पुसून काढावं आणि व्यक्तीच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी. = जवळ बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक द्यायला सुरुवात करावी. कारण वरील जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो व थंडतेमुळे शरीराचे उष्णतामान कमी व्हायला मदत होते. = उन्हामुळे नाकातून रक्तस्रव सुरू झाला असेल तर नाकाच्या मांसल भागावर दहा मिनिटे प्रत्यक्ष दाब दिल्यास रक्तस्रव थांबतो. = व्यक्तीवर पाण्याचा वर्षाव करावा किंवा त्या व्यक्तीला बाथटबमध्ये बुडवावं वा बर्फ टाकावा. = व्यक्तीला मूच्र्छा आली असेल तर श्वसनक्रियेची तपासणी करावी. = व्यक्ती शुद्धीवर आल्यावर त्याला पाणी पिण्यास द्यावं. |