एप्रिल महिन्यातच पारा वाढला आहे, अंगाची अक्षरश: लाही लाही होतेय. कितीही काळजी घेतली तरी या उन्हाचा थोडासा का होईना पण आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. मग आपली अशी अवस्था असेल तर लहान मुलांची काय अवस्था होत असेल. अगदी नवजात किंवा एक- दोन वर्षाच्या बाळाची या उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊ या. उन्हाळ्याचा त्रास आपल्याला खूप होतो मग तो लहान मुलांना किती होत असेल. लहान मूल मग ते अगदी नवजात बालक असो वा पाच वर्षाच्या आतलं असो. कित्येकदा छोटया मुलांना काय होतंय आणि काय नाही याचा अंदाजच आपल्याला येत नाही. उन्हाळ्यात आपल्याला जसं गरम होतं तसं लहान मुलांनादेखील गरम होत असतं. अगदी नवजात बालकांना तर कायमच कपडय़ांत गुंडाळून ठेवलं जातं. सगळ्याच लहान मुलांची त्वचा अतिशय नाजूक असते. अशा वेळी उन्हाळ्यापासून त्यांच्या नाजूक त्वचेचा आंतरबाहय़ बचाव कसा करता येईल हे पाहू या. सुती कपडे घाला आपल्या बाळाला सुती कपडे घालता येतील याकडे लक्ष द्या. तसंच हे कपडे अतिशय आरामदायी असावेत. म्हणजे ते घट्ट नसावेत. सिंथेटिक कापड वापरलं तर त्यामुळे मुलांच्या अंगात उष्णता टिकून राहते. त्यामुळे त्यांच्या अंगावर घामोळं येऊ शकतं. आजकाल बाजारात कॉटनचे लांब हात-पाय असलेले कपडे मिळतात. त्याचा वापर करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही क्रीम लावू नका. उन्हापासून वाचण्यासाठी त्याला टोपी घाला. पण ही टोपी आकाराने थोडी मोठी असावी. एकदम घट्ट घातली की त्याचा त्रासही मुलांना होतो. दुपारच्या वेळी घरीच थांबा लहान बाळांना दर महिन्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं. पण बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाताना शक्यतो उन्हाच्या वेळी बाहेर पडू नका. पण डॉक्टरांच्या वेळेमुळे तुम्हाला बाहेर पडावंच लागलं तर तुमचं बाळ सुरक्षित आहे की नाही याची प्रथम खात्री करून घ्या. थोडं फिरायला लागला असाल तर त्याला सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन ओसरलं की बाहेर फिरायला घेऊन जा. गादी बदला लहान मुलं ज्या गादीवर झोपतात ती गादी पूर्णत: कापसाची असेल याकडे लक्ष द्या. कारण फोमच्या किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या गाद्यांमुळे त्यांना गरम होऊ शकतं. कापसाच्या गादीमुळे गरम होत नाही आणि हवाही त्यांच्यापर्यंत पोहोचते. डायपरचा वापर कमी करा आजकाल मुलांना डायपर घातलं जातं, मात्र उन्हाळ्यात डायपरचा वापर कमीच करावा. या डायपरमुळे घाम त्वचेवरच राहतो. त्वचा सतत ओलसर राहिल्यामुळे त्वचेवर पुरळ येणे किंवा ती लाल होणे असे विकार होऊ शकतात. म्हणून या दिवसांत डायपरचा वापर कमीच करा. त्याऐवजी कापडाचा वापर करावा. कपडयामुळे त्वचा कोरडी राहते. चांगल्या पदार्थाचं प्रमाण वाढवा लस्सी, मिल्क शेक, फळांचा ताजा रस(बाटलीबंद रस नव्हे) आणि नारळपाणी अशा पदार्थाचा लहान मुलांच्या आहारात समावेश करावा. तुमचं बाळ सहा महिन्यांपेक्षा लहान असेल आणि तुम्ही केवळ स्तनपान देत असाल तर तुम्हाला बाळाला अतिरिक्त पाणी देण्याची गरज पडत नाही. अगदी या दिवसांतही नाही. कारण या दुधात मुळातच पाणीच असतं. उन्हाळ्यात मुलं मुळातच थोडया थोडया वेळाने स्तनपानाची मागणी करतात. ज्यामुळे त्यांना अधिक दूध मिळतं. आणि हे दूध त्यांना अधिक ताजंतवानं ठेवण्यास मदत होते. दुधावाटे त्यांना भरपूर प्रमाणात पाणी मिळतं. जी मुलं बाटलीने दूध पितात त्यांच्यासाठी गरम पाणी उकळून थंड केलेलं पाणी देणं हितकारक ठरतं. बाहेरचे पदार्थ टाळाच आईस्क्रीम, गोळा, कुल्फी किंवा फळांचा ज्यूस असे बाहेरचे, रस्त्यावरचे पदार्थ लहान मुलांना नेहमीच आकर्षित करतात. अगदीच काही नाही तर ते बाहेरचं थंडगार पाणी मागतात. म्हणूनच बाहेर पडताना त्यांचं जेवण आणि पाणी कायम तुमच्यासोबत ठेवा. बाहेर घेऊन जाताना प्लास्टिकच्या डब्याचा वापर करावा. मुलांना खायला देण्याआधी प्रथम स्वत: खाऊन बघा. खराब झालं नाही याची खात्री करा. कारण उन्हाळ्यात शिजवलेलं अन्न खराब होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात मालिश नकोच नवजात बालकांना मालिश करण्याची पद्धत आहे. मालिश करताना वापरलं जाणारं तेल, पेट्रोलियम जेली किंवा अन्य मॉइश्चर याचा वापर न केलेलाच बरा. तेलाने मालिश केल्याने घाम त्वचेवरच राहतो. त्यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यातही तुम्हाला उन्हाळ्यात मालिश करायचं असेलच तर ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करा. जे मुळातच थंड असतं. मात्र अंघोळीच्या वेळी हे तेल पूर्णत: स्वच्छ होईल, याकडे लक्ष द्यावं. पावडरही नको घाम येऊ नये किंवा मुलांना फ्रेश वाटावं म्हणून अंघोळ केल्यावर कित्येकदा मुलांना भरपूर पावडर लावली जाते. मात्र घाम आल्यावर त्यात पावडर मिसळली तर त्याचा त्वचेवर थर जमा होतो परिणामी अंगावर खाज उठणे असे विकार होतात. म्हणून पावडरीचा वापर करूच नका. शक्यतो डायपर आणि ओल्या जागी पावडर न लावणेच उत्तम. पावडरीचा गंध प्रत्येक श्वासागणिक येणार नाही याची काळजी घ्या. पावडर लावायचीच असेल तर ती योग्य पद्धतीने लावली जाते की नाही याची काळजी घ्या. तसंच ती नीट पसरवा. थंड पाण्यात खेळू या काही मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडतं. अंघोळीच्या वेळी ही मुलं हमखास पाण्यात खेळण्याचा आग्रह करतात. अशा वेळी मुलांना पाण्यात खेळू द्यावं. अगदी आजूबाजूला पाणी उडेपर्यंत त्यांना मनसोक्त डुंबू द्यावं. मात्र त्यावेळी तुम्ही त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. सार्वजनिक स्वीमिंग पूलचा वापर करूच नका. कारण तिथलं पाणी स्वच्छ नसतं. एअरकंडिशन किंवा कुलरचा वापर मुलांची अंघोळ झाल्यावर त्यांना ताबडतोब एअरकंडिशन किंवा कुलरसमोर आणू नये. त्यांच्या अंगात पूर्ण कपडे आणि त्यांचे केस कोरडे असतील तेव्हाच एसी किंवा कुलर सुरू करावा. तसंच एअरकंडिशन किंवा कुलरमध्ये वावरताना त्यांच्या अंगावर सुती कपडे असणं आवश्यक आहे. नाहीतर त्यांना सर्दी होण्याची शक्यता असते. तसंच तुमचं मूल जेव्हा झोपलेलं असतं, तेव्हा एअरकंडिशन किंवा कुलरचा झोत त्याच्यावर येणार नाही याची काळजी घ्या. अशा थंड वातावरणात राहिल्यानंतर एकदम गरम वातावरणात मुलांना नेणं टाळाच. आधी एअरकंडिशन किंवा कुलर बंद करावा. त्यानंतर थोडा वेळ त्यांना त्या वातावरणात ठेवू द्यावं. थंडावा कमी झाला की मगच बाहेर आणावं. गॉगल किंवा चष्म्याचा वापर कित्येकदा बाहेर फिरायला जाताना पालक आपल्या मुलांना गॉगल वापरायला देतात. मात्र रस्त्यावरच्या गॉगलची खरेदी करू नका. प्रतिष्ठित ब्रँडचा किंवा यूव्ही प्रोटेक्टने उपयुक्त असावा. गॉगलची निवड तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा. घामोळ्यावर घरगुती उपाय » ताक किंवा पाणीदार दही घाम आल्याच्या जागी लावावं. » मुलतानी माती किंवा गुलाब पाण्याचादेखील वापर करू शकता. कारण हे दोन्ही पदार्थ मुळातच थंड असतात. दहा मिनिटांनंतर हे धुवून टाका. » बाजारात मिळणा-या घामोळ्यांच्या पावडरीचा मुलांसाठी वापर करू नका. |