जेवणाचा डबा हा ऑफिसवाल्यांसाठी आवश्यक बाब आहे. तो जवळ बाळगला तरीही तो खाण्याच्या वेळा कित्येकदा अनियमित असतात. ऑफिसचा जेवणाचा डबा कसा असावा, जेवणाचे नियम ऑफिसमध्ये कसे पाळावेत हे जाणून घ्यायला हवं. प्रत्येक जण कुठे ना कुठे काम करतं. काही जणांच्या शिफ्ट असतात. त्यामुळे कित्येक जण सकाळी, तर कित्येक जण रात्रपाळी करतात. अनेकांना दुपारची मधली शिफ्ट असते. त्याचा परिणाम आपल्या जेवणावर होतो. जेवणाच्या वेळा बदलतात. कित्येकदा तर कामाच्या व्यापामुळे जेवणाची वेळही उटलून जाते. मग कित्येकदा जंग फुडलाच प्राधान्य दिलं जातं किंवा कॅन्टीनकडे मोर्चा वळवला जातो. कधी कधी एकीकडे काम आणि एकीकडे जेवण करता येईल असा काहीसा डबा आणला जातो. मात्र या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणूनच ऑफिसमध्ये असताना जेवणाच्या साधारण काय वेळा पाळाव्यात किंवा आहार कसा असावा हे जाणून घेऊया. » चहा किंवा कॉफीने तरतरी येते, मरगळ दूर होते म्हणून कित्येक जणांना ऑफिसमध्ये कामाला सुरुवात करताना प्रथम चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. कित्येक जण दर एक दोन तासाने चहा-कॉफीचं सेवन करतात. मात्र यातील टॅनीन या घटकाने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे कोणाच्या लक्षात येत नाही. कॅफीनमुळे रात्रीची झोप उडते, अॅसिडिटी वाढते. म्हणून दोनपेक्षा अधिक वेळा दिवसातून चहा किंवा कॉफीचं सेवन करू नये. » अलीकडे कित्येक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कामाचे तास वाढले आहेत. त्यामुळे दुपारचं जेवण झाल्यावर संध्याकाळी भूक लागते. अशा वेळी कॅन्टीनकडे मोर्चा वळतो. मग अरबट-चरबट पदार्थाचं सेवन केलं जातं. रस्त्यावरील जंक फुडला प्राधान्य दिलं जातं. » संध्याकाळच्या भुकेसाठी जवळ एखादा लहानसा बिस्किटचा पुडा, सुकामेवा, फराळचे घरगुती पदार्थ किंवा एखादं फळ जवळ बाळगावं. तसंच कुरमुरे, चणे, घरी केलेला उपमा, शिरा, इडली, शंकरपाळे असे पदार्थ खावेत. म्हणजे बाहेरच्या जंक फुडला चाप बसेल. कित्येक जण वेफर्स, चिवडा, फरसाण डब्यातून आणतात. मात्र असे पदार्थ आवश्यकतेपेक्षा अधिक खाल्ले जातात. नको असताना त्यांचं सेवन केल्यामुळे त्यांचं नीट पचन होत नाही. म्हणून भूक लागली असेल तरच या पदार्थाचं सेवन करावं. »कित्येकदा ऑफिसमध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी बटाटावडा, भजी, समोसे असे पदार्थ खाण्याची सवय असते. बाहेरच्या पदार्थामध्ये तेलाचा दर्जा कसा असतो याचा अंदाज येत नाही. असे तेलकट पदार्थ अपचन किंवा अॅसिडिटीसारख्या आजारांना आमंत्रण देतं. मुख्य म्हणजे शरीरात आळस निर्माण होतो आणि सुस्ती येते. कामात लक्ष लागत नाही. मन एकाग्र होत नाही. त्याचा परिणाम कामावर होतो. म्हणून अशा पदार्थाचं सेवन टाळावं. » कित्येकदा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक मीटिंग्जला जाणं होतं. अशा वेळी तिथे जेवण किंवा काही पदार्थ खाल्ले जातात. अशा वेळी भरमसाट खाणं टाळावं. एक तर ते तुमच्या शिष्टाचाराला शोभणार नाही आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे दुपारनंतर म्हणजे डबा खाऊन जाणार असाल तर अशा वेळी खाणं टाळलेलंच योग्य. अगदीच आग्रह होत असेल तर ज्यूसला प्राधान्य द्यावं. » बरेचदा लवकर घर सोडलं जातं आणि कामावरून उशिरा घरी परतणं होतं. अशा लोकांनी तर आपल्या डब्यातून चौरस किंवा समतोल आहार कसा मिळेल याचा विचार करावा, डब्यात भाजी, पोळी आणि सलाडचा समावेश करावा. सलाड जेवण्याच्या वेळी नको असेल तर तो डबा संध्याकाळच्या वेळी ठेवावा. फळांच्या फोडी किंवा स्नॅक्स संध्याकाळच्या वेळी घ्यावेत. वाटल्यास एखादी पोळी किंवा पराठादेखील तुम्ही नंतर खाऊ शकता. » रात्रपाळीच्या लोकांनी शक्य असल्यास घरी संपूर्ण जेवूनच जावं. वरण, भात, भाजी, पोळी आणि एखादं फळ असा आहार नियमित घ्यावा. रात्रीच्या वेळी भूक लागत असल्यास जवळ एखादं फळ ठेवावं म्हणजे आराम मिळतो. » सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसमध्ये जेवणाच्या वेळा पाळाव्यात. काही ठिकाणी जेवणाची वेळ निश्चित नसते अशा वेळी कधीही डबा खाल्ला जातो. मात्र प्रत्येकाने स्वत:च्या जेवणाची एक ठरावीक वेळ निश्चित करून घ्यावी. त्या वेळेला नियमित जेवण होईल याकडे लक्ष द्यावं. » बरेचदा ऑफिसमध्ये काही कारणाने पार्टी आयोजित केली जाते. अशा वेळीदेखील आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे अति तेलकट किंवा अति मसालेदार पदार्थ खाणं व्यर्जच करावं. त्यामुळे शरीराला हानी होत नाही. अति मसालेदार पदार्थ खाल्ल्याने त्याचा त्रास होतो. परिणामी अपचन होते. » उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या वेळी शक्य असल्यास ताक, दही, लस्सी किंवा थंड दुधाचा आहारात समावेश करता आला तर उत्तम. शरीर थंड राहाण्यास मदत होते. |