Tuesday, November 26, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

शरीर सुदृढ बनवणारा हेमंत

हिवाळा म्हणजे हेमंत ऋतू. उन्हाळ्यात काहिली झाल्याने तर पावसाळ्यात खड्ड्यांनी आणि पाणी तुंबल्यामुळे, गाड्या उशिरा धावण्यामुळे नाराज मुंबईकर हव्याहव्याशा वाटणा-या गारव्या (हिवाळ्या)कडे लक्ष लावून असतात. या काळात बाह्य वातावरणात गारवा वाढू लागल्याने नेहमीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल होऊ लागतात. या ऋतूत व्यायाम करण्याचा आणि काहीही खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण सगळं पचवण्याची ताकद या तूत आहे.
मनाची प्रसन्नता आणि उत्साह वाढण्यासोबतच भूक लागण्याची क्रियाही इतर ऋतूंच्या तुलनेत जलद होऊ लागते. बाहेरच्या वातावरणात वाढलेल्या शुष्कतेमुळे (कोरडेपणा), गारव्यामुळे स्निग्धांशयुक्त पदार्थाचे सेवन ही तुमच्या शरीरानेच उत्पन्न केलेली गरज असते. म्हणूनच विशेषत: तळलेले किंवा नेहमीपेक्षा तेलकट, चमचमीत,

आलं-लसणाचा जास्त समावेश असलेले गरमागरम पदार्थ ताटात पडू लागतात.

अन्य ऋतूंमध्ये सूर्यकिरण हे पृथ्वीवर सरळ रेषेत पडत असल्यानं उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. हेमंत ऋतूत मात्र ऋतूचक्रानुसार सूर्यकिरणं तिरपी पडू लागतात. म्हणूनच सूर्य लवकर मावळतो व अंधारही लवकर पडतो. तेव्हा आपल्याला दिवस लहान व रात्र मोठी वाटू लागते. संध्याकाळपासूनच गार वारे वाहू लागतात.

वातावरणातील अशा बदलाने शरीरांतर्गत उष्णता जास्त प्रमाणात अडवली गेल्याने भूक लागण्याच्या प्रमाणातही वाढ होऊ लागते. हिवाळ्यात मात्र काही प्रमाणात मसालेदार, तेलकट, चटपटीत खाण्यास थोडी सूट मिळू शकते. उलट हिवाळ्यातच जिभेचे सगळे चोचले पुरवून घ्यावेत. या काळात भूक चांगली लागते आणि काहीही खाल्ल्यास ते पचवण्याची क्षमताही वाढलेली असते. व्यायाम करणा-यांनी थोडा अधिक व्यायाम केला, तरी त्यामुळे फारसं नुकसान होत नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारकच असतो.

हिवाळ्यात हमखास खाव्याशा वाटणा-या पदार्थापैकी नेहमीच्या भज्या, बटाटेवडा वा तत्सम तळलेल्या पदार्थाना एक पौष्टिक आणि रुचकर पर्याय म्हणून अमरावती प्रांतात प्रसिद्ध असलेल्या पौष्टिक वडय़ाची पाककृती देत आहे.

हे अवश्य करा..

>थंड (फ्रीजचं) पाणी पिणं सोडून, कोमट पाणी प्यावं.

>काही गरमागरम पिण्याची लहर आल्यास वारंवार चहा वा काफी पिण्याऐवजी विविध भाज्यांचा, कधी अंड वा चिकन यांचा आलटून-पालटून वापर करून त्यांचं सूप बनवून प्यावं.

>व्यायामासाठी हिवाळा सर्वोत्तम मानला जातो. सकाळ-संध्याकाळचं चालणं (किमान ४५ मिनिटं) तसंच नियमितपणे केली जाणारी योगासनं, प्राणायामांचे प्रकारही शरीरस्वास्थ्याला अत्यंत लाभदायी ठरतात.

Read More »

ब्लडप्रेशरचं हाय अलर्ट

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्या-पिण्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. इतकंच नव्हे तर चिंता, राग, भीती यासारखे मानसिक विकार वाढले आहेत. परिणामी शहरी भागात उच्च रक्तदाबाचा आजार बळावतो आहे. या आजाराची लक्षणं काय आहेत. हा विकार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती

उच्च रक्तदाब म्हणजे वय आणि इतर वर्गीकरण केलेल्या रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. याचा अर्थ रक्त धमन्यांमध्ये तणाव निर्माण होणे होय. सामान्यत: रक्तदाब १२०/८० पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. १२०/८० किंवा १३९/८९ च्या दरम्यानचा दाब हा पूर्व उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो. तसंच १४०/९० पेक्षा अधिक असलेला रक्तदाब हा उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो.

काही वर्षापासून भारतामध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर १९६० मध्ये पाच टक्के आणि १९९० मध्ये १२ ते १५ टक्के व्यक्तींमध्ये हा आजार आढळायचा. मात्र २००० या वर्षी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार भारताच्या शहरी भागांमध्ये हे प्रमाण २५ टक्के आणि ग्रामीण भागांमध्ये १० टक्के इतक्या प्रमाणात हा आजार पसरल्याचे दिसून आलं होतं. तर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या अहवालानुसार शहरी भागांतील मध्यमवर्गीयांमध्ये ३२ टक्के पुरुष आणि ३० टक्के महिलांमध्ये उच्च रक्तदाबाच्या विकाराचा प्रसार झाल्याचं आढळलं आहे. तसेच उच्च रक्तदाब-पूर्व ही स्थिती शहरी भागांतील मध्यमवर्गीयांत ४० टक्के पुरुष आणि ३० टक्के महिलांमध्ये असल्याचीही नोंद या अहवालात आहे. या आकडेवारीतून असे दिसून येते की, प्रौढ वयातील लोकसंख्येपैकी केवळ ३० ते ४० टक्के प्रौढ व्यक्तींचा रक्तदाब सामान्य स्थितीत म्हणजे १२० एमएम एचजी किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणातील आकुंचित रक्तदाब (सिस्टॉलिक ब्लडप्रेशर) व ८० ते ८९ एमएम एचजी किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणातील प्रसारित रक्तदाब (डियस्टॉलिक ब्लड प्रेशर) या स्थितीमध्ये आहे.

उच्च रक्तदाब या आजारामुळे शरीरातील विविध अवयवांचे नुकसान होऊ शकते. प्रामुख्याने मेंदू, हृदय, मूत्रिपड आणि डोळे या अवयवांवर या विकाराचा अधिक परिणाम होताना दिसून येतो. रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-या विविध प्रकारच्या शारीरिक आघातांपैकी (स्ट्रोक) ५७ टक्के आघात हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे मृत्यू ओढवू शकतो, त्यापैकी २४ टक्के आजार हे उच्च रक्तदाबामुळे होतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा प्रतिबंध आणि नियंत्रण या दोन गोष्टी अत्यंत महवाच्या ठरतात, असे मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये कन्सल्टंट कार्डिओलॉजी पदावर कार्यरत असलेले डॉ. संतोषकुमार डोरा यांनी सांगितले आहे.

काय काळजी घ्यावी?

>धूम्रपान टाळणे
>अतिप्रमाणात अल्कोहोलचं सेवन करणं टाळावं
>रोज नियमितपणे व्यायाम करावा. शारीरिक व्यायाम करतानाही वेगाने चालणं, मंदगतीने धावणं यासारखे शरीराकडून मेहनत करून घेणारे व्यायाम करायला हवेत. विशेष म्हणजे, आठवड्यातील अधिकाधिक दिवस, रोज किमान ४५ मिनिटं किंवा एक तासापर्यंत अशा प्रकारचे व्यायाम करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बीएमआयचे (बॉडी मास इंडेक्स-उंची व वजन यांचे गुणोत्तर) प्रमाण २० ते २५ पर्यंत राहावं यासाठी वजन नियंत्रित ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. रोजच्या आहारातील मिठाचं एकूण प्रमाण सहा ग्रॅम इतकंच असावं. तसंच रोजच्या आहारामध्ये चरबीयुक्त घटक कमी आणि तंतूमय घटक अधिक असणंही जरुरीचं आहे.

कारणं

>चिंता, राग, भीती, इत्यादी मानसिक विकार
>आनुवंशिकता
>आहात मिठाचे प्रमाण अधिक असणं
>वजन जास्त असणं

दुष्परिणाम

वाढलेला रक्तदाब हा मेंदूतील वाहिन्या फुटण्याचं कारण असू शकतो. मेंदूमधील वाहिनी फुटल्यास मेंदूत रक्तस्रव होतो. हे रक्त काही काळाने गोठतं. रक्ताची ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते. मेंदूचा जो भाग दाबला जातो तो भाग शरीरातील ज्या भागाचं नियंत्रण करत असतो तो शरीराचा अवयव लुळा पडतो आणि यालाच लकवा असं म्हणतात. थोडक्यात वाढलेला रक्तदाब लकवा निर्माण करू शकतो. लकवा होण्यामागे कित्येक वेळा अनियंत्रित रक्तदाब हेच कारण असतं.

Read More »

जॉगर्सची आरोग्यदायी पेयं

जॉगर्स पार्क आणि चौपाटीवर वॉक, जॉगिंग किंवा व्यायामासाठी येणा-या मंडळीसाठी या जागांच्या आसपास सरबतांचे छोटे छोटे स्टॉल्स लावलेले दिसतात आणि ही सरबतं आवडीने पिणा-यांची संख्याही तितकीच वाढली आहे. मात्र पेयं किंवा सरबत पिण्यामागे नेमकं कारण काय आहे, तसंच त्या पेयांचा शरीराच्या दृष्टीने काय महत्त्व आहे किंबहुना ही पेयं कोणती आहेत, याविषयी थोडंसं
उत्तम स्वास्थ्यासाठी सकाळी उठल्यावर पाणी किंवा आरोग्यदायी पेय घेणं आवश्यक असतं, असं प्राचीन भारतीयांनी सांगितलं आहे. मात्र शहरातील धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणं राहूनच जातं. आरोग्य सांभाळण्यासाठी दैनंदिन व्यायाम, योगासनं, चालणं, धावणं या गोष्टी कराव्याच लागतात. सकाळची हवा आणि कोवळं ऊन हे आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतं. त्यामुळे शक्यतो व्यायाम, योगासनं आणि धावण्यासाठी सकाळच्या वेळेलाच पसंती दिली जाते. ज्या ठिकाणी चौपाटीसारख्या जागा नसतील त्या ठिकाणी एखाद्या सोसायटीजवळ जॉगिंग ट्रॅक्स उभारले जातात. जिथे सकाळी केवळ जॉगर्सचंच राज्य असतं. वांद्रे येथील जॉगर्स पार्क, दादरमधील शिवाजी पार्क, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरातील आरे कॉलनी अशी काही सार्वजनिक ठिकाणं तर काही खासगी वसाहतींमध्ये स्वत:ची उद्यानं असतात.

या जॉगर्सच्या हेल्थची काळजी घेण्यासाठी आवळा, कारलं, कडुलिंब, कोकम इतकंच नाही तर ग्रीन टीचीदेखील विक्री होऊ लागली आहे. जॉगिंग अथवा व्यायाम केल्यानंतर खूप घाम येणं, खूप भूक लागणं, दम लागणं, घसा कोरडा पडणं, काही वेळा शरीरातील ग्लुकोज कमी होणे.. अशा काही गोष्टी होत राहतात. अशा वेळी या जॉगर्सना गरज असते ती काहीतरी पण आरोग्यदायी आणि तेही जलद खाण्या-पिण्याची. म्हणूनच व्यायाम, जॉगिंगच्या जोडीला आरोग्यदायी पेयाचं सेवन करणंही तितकंच गरजेचं असतं. जॉगर्सची ही गरज लक्षात घेता खास जॉगर्ससाठी आजकाल जॉगिंग ट्रॅकच्या, गार्डनच्या बाहेर किंवा चौपाटीच्या कट्ट्याजवळ आरोग्यदायी पेयं विकण्यासाठी छोटे स्टॉल्स अथवा टेबल मांडलेले दिसतात आणि या स्टॉलला कित्येकदा ही मंडळी भेट देतात.

आरे कॉलनीमध्ये न्यूझीलँड हॉस्टेलसमोर काही वर्षापासून दीपाली वंजारे आरोग्यदायी पेयांचा स्टॉल लावतात. त्या म्हणतात, 'आमच्या स्टॉलमध्ये आवळा सरबत, कोकम सरबत, कारल्याचं सरबत तर ग्रीन टी अशी आरोग्यदायी पेय आम्ही विक्रीसाठी ठेवतो. केवळ इथेच नाही तर जिथे जिथे जॉगर्सची संख्या जास्त आहे त्या त्या ठिकाणी असे स्टॉल्स लावले जातात. कारण जॉगिंग केल्यानंतर भरपूर घाम येतो. कारण आपल्या शरीरातल्या कॅलरीज कमी होतात. त्या एकदम कमी झाल्यामुळे तसंच रिकाम्यापोटी बाहेर पडल्यामुळे कित्येक जणांना चक्कर येणं, धाप लागणं असे प्रकार होतात. अशा वेळी शरीरातील तापमानाचं संतुलन राखण्यासाठी अशा सरबतांचं सेवन केल्यास बरं वाटतं. या सरबतांचं सेवन करायचं असतं ते चवीला इतर ज्यूसप्रमाणे नसतात. ते चवीला तुरट आणि कडवट असतात. पण त्यांचा हा कडवटपणा किंवा तुरटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडी साखर घातली जाते. कित्येक महिला जॉगर्स पार्कमध्ये योगासनं करायला येतात, काही ठिकाणी तर सामूहिक योगासनं केली जातात. अशा स्त्रियांनी वजन कमी करण्यासाठी काही विशेष पेयांचं सेवन करणं आवश्यक असतं.'

आरोग्यासाठी उत्तम आणि स्वास्थ्यदायी पेयं

कारल्याचं सरबत : कारल्याचं सरबत चवीला फारच कडवट. मात्र स्वास्थ्यासाठी सगळ्यात उत्तम रस आहे. यात सी व्हिटॅमिन असतं. तसंच शरीरातील चरबी कमी करतं. मधुमेही रुग्णांसाठी हे अत्यंत गुणकारी आहे.

फळांचं सरबत : मोसंबी, संत्री, कलिंगड अशा फळांचेही ज्युस स्वास्थ्यासाठी चांगले असतात. कलिंगडात लोहाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अनिमियासारखे त्रास असणा-यांना सकाळीच अनशापोटी हे सरबत सेवन करणं उत्तम ठरतं. कलिंगडाच्या खालोखाल सफरचंदाचं ज्युसही शरीरातील लोहाचं प्रमाण वाढवण्यास उपयुक्त आहे.

आवळ्याचं सरबत : आवळा हे फळ थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतं. अशा आवळ्याचं सरबत थंडीमध्ये 'स्पेशल ड्रिंक' म्हणून या जॉगिंग पार्कच्या बाहेर ठेवलं जातं.

उन्हाळ्यासाठी विशेष पेय : उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंड पेयांची गरज जास्त भासते. बर्फ टाकून थंड केलेल्या पेयापेक्षा शरीराला आतून थंडावा देणा-या पेयांचं सेवन करावं. यासाठी तुळशीच्या बिया दुधात भिजवून त्याची पातळ खीर तयार करून ती सेवन करावी. यामुळे तहान तर भागतेच, पण त्यातील पौष्टिक आणि औषधी गुणधर्माचा शरीराला फायदाही होतो. दूध आणि तुळशीच्या बियांपासून बनवलेल्या या खिरीमधून साधारणत: १५० कॅलरीज मिळतात.

गरम पेय : काही मंडळी थंड सरबत पिण्याऐवजी गरम पेय पिणं अधिक पसंत करतात. या गरम पेयांमध्ये सर्वाधिक स्वास्थ्यपूर्ण समजलं जाणारं पेय म्हणजे ग्रीन टी. मधुमेहाच्या रुग्णांसाठी, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी ग्रीन टी अतिशय उपयुक्त आहे. ग्रीन टीसोबतच वजन कमी करण्यासाठी, सुडौल बांधा ठेवण्यासाठी गरम पाणी, त्यात लिंबाचा रस, पुदिन्याची पानं आणि दोन चमचे मध टाकून त्या पेयाचं अनशापोटी सेवन केलेलं चांगलं असतं. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन आटोक्यात येतं.

गव्हांकुरांचं सरबत : उष्ण प्रकृतीच्या व्यक्तीसाठी हे सरबत अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी मदत होते. असं सरबत रोज प्यायल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

भाज्यांचं सरबत : गाजर, काकडी, दुधीभोपळा, बीट या अशा फळभाज्यांचं सरबतही आरोग्यासाठी उत्तम समजलं जातं.

केवळ पेयच नव्हे तर या सर्व पेयांसोबतच कित्येक ठिकाणी उकडलेले मूग, मटकी, चणे आणि शेंगदाणेदेखील ठेवलेले असतात. खूप दमल्यावर शक्ती मिळण्यासाठी या पदार्थाचं सेवन केलं जातं. कारण त्यातून प्राथमिक पोषक तत्त्व, जीवनसत्त्व आणि खनिजद्रव्यंही शरीराला ताबडतोब मिळतात.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe