Tuesday, November 19, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

चिरतारुण्यासाठी..

जसजसं वय वाढतं तसतसं चेह-यावर व इतर भागांवर सुरकुत्या, डाग पडायला लागतात. शरीराची त्वचा सैल पडायला लागते. केस पांढरे होतात. हे असतं एजिंग म्हणजे शरीरावर पसरत जाणारी वृद्धत्वाची लक्षणं. मग शरीरावरील ही वृद्धत्वाची चिन्हं लपवण्यासाठी बोटॉक्ससारखी इंजेक्शन्स घेतली जातात, महागडी क्रीम, लोशन व औषधं वापरली जातात. पण येणा-या वृद्धत्वाचं टेन्शन न घेता जरा आपल्या आसपास डोकावलं तर आपल्या लक्षात येईल की महागडया औषधांपेक्षा निसर्गातच चिरतरुण राहण्यासाठी मदत करू शकणा-या औषधांचा खूप मोठा खजिना आहे.

वय वाढणं किंवा वाढत्या वयानुसार चेह-यावर सुरकुत्या येणं, मुरुमं-पुटकुळ्या येणं ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. वयवाढीनुसार अशा समस्या वाढतात. मात्र याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यावर मात करून अधिकाधिक तरुण कसं राहता येईल याचा विचार करा. पण त्यासाठी बाजारात मिळणा-या महागडया क्रीमचा वापर करण्यापेक्षा काही नैसर्गिक गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केलात तर यावर अगदी सहज मात करता येईल.

अश्वगंधा

ही वनस्पती प्रामुख्याने तारुण्याशी संबंधित आहे. अश्वगंधामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते. ती चेतासंस्थांना शांत करतेच तसंच ताण कमी करण्याचं काम करते. शरीरात ऊर्जा निर्माण करते. दीर्घकाळापासून येत असलेला थकवा अश्वगंधामुळे दूर होतो. इतकंच नव्हे तर पाठीचा कणा आणि सांधेदुखीवर ही अतिशय गुणकारी आहे.


गोटु कोला

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी असणा-या टॉनिकमध्ये ही वनस्पती प्रामुख्याने वापरली जाते. इतकंच नव्हे तर शरीराला झालेल्या कोणत्याही इजेचं अथवा दुखापतीचं निवारण करते. नियमित सेवनाने मानसिक ताण कमी करते. तसंच धमन्यांसाठीदेखील गोटु कोला चांगली आहे. हर्बल टीमध्ये गोटु कोला वापरली जाते त्यामुळे दिवसातून एकदा तरी ग्रीन टी घ्यावा.


तुळस

ज्वालाग्रही, जंतूविरोधी असे कितीतरी गुण तुळशीत आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनी तुळशीची पानं आवर्जून सेवन करावी. तसंच कॅन्सरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही तुळशीचा वापर होतो. तुळशीचा अर्क काढून सेवन केल्याने कित्येक आजारापांसून आपण दूर राहू शकतो.


सेलरी

आयुर्वेदाचार्य त्यांच्या औषधांमध्ये प्रामुख्याने सेलरीच्या बियांचा खूप वापर करतात. सर्वेक्षणानुसार असं आढळून आलं आहे की, सेलरीच्या बियांमुळे सांधेदुखी किंवा गाऊटचा त्रास कमी होतो. याचा आपल्या आहारात समावेश करणं अतिशय सोपं आहे. एक चमचाभर सेलरीच्या बिया कपभर उकळत्या पाण्यात घालाव्यात. ते पाणी थंड झाल्यावर प्यावं. असं दिवसातून दोनदा करावं.


हळद

हळदीचे बरेच फायदे आहेत. हळदीमुळे पेंशींचं संरक्षण होतं. तसंच हळदीमुळे सुरकुत्या, व्रण तसंच आणखी काही गोष्टींपासून त्वचेचं संरक्षण होतं. तसेच इतर काही त्वचेचे आजार होऊ नये म्हणूनही तिचा वापर करावा.

Read More »

बदललेला दिनक्रम पूर्ववत करा!

संगणकाने आयुष्य व्यापून टाकल्याने सध्याची शारीरिक चलनवलन मंदावलेली जीवनशैली हीच मुळात शरीरात अनेक दुर्धर रोग जडायला कारणीभूत होतेय. त्यातच सणासुदीनिमित्त घेतला जाणारा मिष्टान्नयुक्त वा अति चमचमीत आहार म्हणजे कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा हल्ली लहान वयात, तेही अगदी सहजपणे जडणा-या आजारांना जणू आयतं कुरण..

दिवाळीचे मुख्य दिवस पार पडल्यानंतर प्रत्येक जण आपला दैनंदिन आहार घ्यायला सुरुवात करतो. तर काही घरांमध्ये जवळपास महिनाभर फराळ आणि मिष्टान्नावर ताव मारण्याच्या निमित्ताने दिवाळी सुरूच असते. विशेष बाब म्हणजे, महिलावर्गाची फराळ बनवताना चांगलीच दमछाक झालेली असते. तसंच दिवाळीत नातेवाईक, मित्रमंडळींकडे प्राधान्यानं ये-जा सुरू असल्याने दैनंदिन व्यायाम, वा योगासनांनाही सुट्टी असते. अशा वेळी जास्त दिवसांच्या अंतरानंतर केल्या जाणा-या व्यायामामध्ये शरीरावर जास्त ताण पडेल असे व्यायामप्रकार करू नयेत. साधा-सोपा व आपल्या स्नायूंना झेपणारा, ताण न पडणा-या व्यायामांनी पुन्हा आपला तात्पुरता बदललेला दिनक्रम पूर्ववत करावा.

आहाराची वर्गवारी करताना, त्याची विभागणी जर स्त्री-पुरुष वर्गानुसार आणि त्यांच्या दैनंदिन क्रियांनुसार करण्यात आली, तर ती दोघांनाही जास्त उपयुक्त ठरू शकते. स्त्रियांच्या आंतरिक शरीररचनेनुसार स्र्वणारी स्रवकं ही निश्चितच पुरुषांच्या शरीररचनेहून भिन्न असतात. त्यानुसार त्यांची मानसिक आणि भावनिक स्थितीही पुरुषांपेक्षा वेगळी असते. म्हणूनच विशेषत: एकाच वेळी गृहिणी आणि नोकरदार अशा दुहेरी भूमिका निभावणा-या स्त्रियांनी शक्यतो पचायला हलका, पण पौष्टिक/चौरस आहार घ्यावा.

मुळात घरातली व्यक्ती ही आपला दिनक्रम कधी सुरू करते, यावर तिचा आहार ठरवता येईल. कधी सणासुदीच्या तयारीनिमित्त लवकर उठावं लागतं किंवा नेहमीच्या कामांच्या वेळांनुसार उशिरा झोपावं लागतं. अपु-या झोपेमुळेही अनेक व्याधी जडतात. वारंवार जागरण होऊ लागल्यास उठल्यावर आणि त्या पूर्ण दिवसभरात पचायला हलक्या असलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करावा. दिवाळीनंतर मकरसंक्रांतीपर्यंत मोठा असा कोणताही सण नाही. त्यामुळे पचायला जड अशा गोडाधोडापासून काही काळ तरी पोटाला आराम देता येईल असा हा कालावधी आहे.

आपला 'दैनंदिन आहार' हा संपूर्ण निरोगी आरोग्यदायी जीवनशैलीतला एक महत्त्वपूर्ण आणि तितकाच अविभाज्य घटक आहे. परंतु त्याचबरोबर वेळेवर, पुरेशी झोप आणि विहार याकडेही लक्ष देणं, हे काही वर्षापूर्वीपर्यंत आवश्यक समजलं आणि पाळलं जायचं. आता हे शक्य होत नसल्यानं ते अपरिहार्य झालं आहे. अजून एक लक्षात ठेवायची महत्त्वाची बाब म्हणजे सणासुदीला खाल्लं जाणारं मिष्टान्न, हे दैनंदिन आहारात खाल्लं जात नसल्यामुळे या पदार्थाचा आपल्या पचनशक्तीवर अतिरिक्त ताण पडतो.
हे जरूर करा..

मिष्टान्न, फराळ आणि पक्वान्नांच्या आवडीखातर झालेल्या अतिरेकी सेवनामुळे शरीरात साठलेल्या विषद्रव्यांचं उत्सर्जन करण्यासाठी मूठभर मूग दोन पेले पाण्यात ते मऊ शिजेपर्यंत उकळवावे. मुगाचा हा पेलाभर अर्क सकाळी उठल्यावर प्यावा. त्यात चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर मीरेपूडही घालावी. पौष्टिक न्याहरीसह पेलाभर दूध आणि दोन बदामही (बदामातील 'ई' जीवसत्त्व डोळे, त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहे.) खाल्ल्यास उत्तम. दुपारच्या जेवणात भातासोबत मुगाच्या डाळीचं वरण, पथ्यकर भाज्यांचा (दुधी भोपळा, लाल भोपळा, पडवळ, घोसाळं, दोडका) समावेश असावा. रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा अवश्य खावा, जेणेकरून निसर्गत:च असलेली वा तेलकट-तूपकट खाऊन वाढलेली चरबी घटण्यास मदत होईल.


दुधी-टोमॅटो सूप

साहित्य : दीड ते दोन वाटया दुधीचे तुकडे, एक वाटी टोमॅटोचे तुकडे, अर्धी वाटी गाजराचे तुकडे, एक वाटी लाल भोपळ्याचे तुकडे, दोन छोटया आकाराचे चिरलेले कांदे, अर्धा चमचा आल्याची पेस्ट, तूप, जीरे, हिंग प्रत्येकी अर्धा चमचा, जीरेपूड, मीरेपूड, दालचिनीपूड प्रत्येकी चिमूटभर, साखर व मीठ चवीनुसार.

कृती : प्रथम सर्व भाज्यांचे तुकडे व आल्याची पेस्ट एकत्रितपणे कुकरमध्ये सहा ते सात शिट्टया घेऊन मऊ शिजवून घ्यावेत. भाज्यांचं मिश्रण थंड झाल्यावर ते रवीनं घुसळावं. नंतर एका भांडयात तूप, जीरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात हा भाज्यांचा गर ओतावा. चवीनुसार साखर, जीरेपूड, मीरेपूड आणि चिमूटभर दालचिनीपूडही घालून मिश्रण एकजीव करावं. चांगली उकळी येऊ द्यावी. सूप तयार. घरी असल्यास संध्याकाळच्या भुकेच्या वेळी वा रात्रीच्या जेवणाऐवजी एक ते दोन मोठा बाऊलभर हे सूप प्यायलं की झाला, 'पौष्टिक आणि हलका-फुलका डाएट'!

Read More »

दातांची अ‍ॅसिडिटी

आम्लयुक्त पदार्थाचं सेवन केल्याने पचन क्रियेदरम्यान अ‍ॅसिडिटी होते. ही अ‍ॅसिडीटी केवळ पोटापुरतीच मर्यादित राहत नाही, तर अ‍ॅसिडिटीची सुरुवात तोंडापासून होते. हानिकारक जीवाणूंची तोंडात वाढ होते. यालाच वैद्यकीय भाषेत दातांची अ‍ॅसिडिटी असं म्हणतात. परिणामी दातांचं आरोग्य धोक्यात येतं. ही अ‍ॅसिडिटी नेमकी कशापासून होते, त्यापासून दातांचं संरक्षण कसं होतं, त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याविषयीची ही माहिती.

दुसरीतल्या रियाला चॉकलेट, गोळ्या, आइस्क्रीमच नाही तर गुलाबजाम, पेढे, बर्फी, लाडू असं काही ना काही गोड खायला नेहमीच आवडतं. इतकंच नाही तर वरण, भात, भाजी, पोळी खाण्यापेक्षा फसफसणा-या शीतपेयांवरच ती पोट भरते. तर पाचवीतला सोहम दात घासायलाच कंटाळा करतो. दात घासायचे म्हटले की तो काही ना काही कारणं देऊन दात घासण्याचं टाळतो. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर त्यांच्याकडे दात घासण्यासाठी आरडाओरड सुरू असते.

रिया, सोहम ही दोन केवळ प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. आजच्या काळात रिया आणि सोहमसारखी कित्येक मुलं आढळतात. ज्यांना केवळ गोड खायलाच आवडतं आणि दात घासायचाही कंटाळा आहे. अशा मुलांचे दात किडलेले, पडलेले असतात. इतकंच नाही तर कधीतरी खाल्लेली कँडीही मौखिक आरोग्य बिघडवू शकते.

कॅलिफोíनया युनिव्हर्सटिच्या संशोधकांनी असं सिद्ध केलं आहे की कधीतरी खाल्लेली कँडी तुमच्या मौखिक आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरते. मौखिक आरोग्य आणि अवमनस्कता (डिमेन्शिया) यांच्यात दाट संबंध असल्याचं संशोधकांच्या निदर्शनास आलं आहे. दिवसातून दोनदा दात घासणाऱ्यांच्या तुलनेत जे दिवसातून एकदाच दात घासतात त्यांना पुढल्या काळात अवमनस्कता होण्याचं प्रमाण ६५ टक्के अधिक असण्याची शक्यता असल्याचं सिद्ध झालं आहे.

अधिक शोध घेतला तर या संशोधनात तथ्य असल्याचं आढळलं. कॅनाडिअन डेंटल असोसिएशनच्या मते, गोड पदार्थ, फसफसणारी शीतपेयं आणि तीव्र अ‍ॅसिड कॉन्स्ट्रेशन असणा-या ज्यूसेसमुळे मुलं तसंच प्रौढांमध्ये दात झिजण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या ३० वर्षात हे प्रमाण बरंच वाढलं असून ती एक चिंतेची बाब बनली आहे. दात खूप संवेदनशील होतात. आम्लामुळे दातांची झीज होते. 'पीएच' म्हणजे शरीरातल्या अ‍ॅसिड्स आणि अल्कलाइन घटकांमधलं संतुलन. तोंडातली पीएचची पातळी कमी झाल्यास आम्लाची पातळी वाढते. केळी, बटाटे, दुधासारखे अन्नघटक तोंडातली पीएच पातळी वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे अशा पदार्थाचं सेवन करणं आवश्यक आहे.

शारीरिक आरोग्यावर मौखिक आरोग्याचा भरपूर प्रभाव पडतो का? या प्रश्नाचं उत्तर शोधल्यास असं आढळून आलं की शारीरिक आरोग्य उत्तम राखणं हे तोंडातल्या आम्लाच्या पातळीवर अवलंबून असतं. मात्र त्याची आपल्याला कल्पनाच नसते. पचनाच्या प्रक्रियेदरम्यान पोटात अ‍ॅसिडिटी होते. ही अ‍ॅसिडिटी केवळ पोटापुरतीच मर्यादित नसते. तिची सुरुवात तोंडातून होते. अ‍ॅसिडिमुळे तोंडात हानिकारक जीवाणूंची झपाटयाने वाढ होते. आश्र्चर्याची बाब म्हणजे, पौष्टिक आहारामुळेही तोंडात आम्लाची निर्मिती होते. काही फळं, भाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थामधे आम्लाची पातळी उच्च असते. ज्यामुळे दात मऊ बनतात आणि त्यामुळे दातांचं इनॅमल निघण्याची शक्यता अधिक असते.

आपण काहीही खाल्लं की तोंडातल्या पीएचची पातळी साधारणत: दोन तासांसाठी कमी होते. लाळ आम्लाला अप्रभारित करण्याचा प्रयत्न करते आणि पीएचची पातळी जवळपास ५.५ पर्यंत(७ म्हणजे अप्रभारित) वाढवते. पण तुम्ही आम्लयुक्त पेयं आणि गोड पदार्थ खातच राहिलात तर लाळेला हे आम्ल अप्रभारित करणं शक्य होत नाही. त्याची परिणती दात खराब होण्यात होते. अ‍ॅस्थेटिक आणि जनरल डेंटल सर्जन तसंच ओरल मेडिसीन आणि रेडिओलॉजीचे तज्ज्ञ डॉ. कमलेश देसाई यांच्या मते, 'मौखिक आरोग्यासाठी किमान ७.२ पीएच असणं आवश्यक आहे. संतुलित आहार आणि रिफाइंड काबरेहायड्रेट्सचं मर्यादित सेवन यातून पीएच संतुलन साधणं अवघड नाही. चूळ भरणे, पाणी पिणे, दात घासणे अशा काही गोष्टींमुळे मौखिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.'

दातांच्या रक्षणासाठी काय कराल?

>> फसफसणारी पेयं आणि गोड पेयं अतिरिक्त प्रमाणात सेवन करणाऱ्यांनी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.

>> दातांचं पीएच संतुलित ठेवण्यासाठी सुका मेवा, दुग्धजन्य पदरथ आणि त्यांच्या जोडीला त्या त्या ऋतूनुसार मिळणारी फळंही खाल्ली पाहिजेत.

>> फ्लुराइडयुक्त पेप्सोडंटसारख्या टूथपेस्टने दिवसातून दोन वेळा, चार मिनिटं दात घासल्याने दातांवरचं इनॅमलचं आवरण सुरक्षित राहतं.

>> काहीही खाल्ल्यावर खळखळून चूळ भरणं आवश्यक आहे. जेणेकरून दातात अडकलेले कण निघून जातात.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe