Tuesday, October 22, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

ब्रेन स्ट्रोकची अदृश्य लक्षणं

आपण कित्येकदा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकतो. पण या आजाराचं मूळ आपल्या जीवनशैलीत आहे याची खूप कमी जणांना माहिती आहे. तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक असून दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. अशा या ब्रेन स्ट्रोकविषयीची माहिती जाणून घेऊया.
बदलती जीवनशैली, जंक फूडचं अतिरिक्त सेवन यामुळे तरुणांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत चाललं आहे. दिवसेंदिवस वाढणारं हे प्रमाण तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकची वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणानुसार सिद्ध झालं आहे. स्ट्रोकपूर्वी जी काही लक्षणं दिसतात ती कित्येकदा आपल्याला कळतच नाहीत. साहजिकच त्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. परिणामी मृत्यूही ओढवतो. एका सर्वेक्षणानुसार जगामध्ये दरवर्षी दोन कोटी लोकांना ब्रेन स्ट्रोक होतो. त्यात साधारणत: ५० लाख लोकांचा मृत्यू होतो. कित्येक लोकांना अपंगत्व येतं. दर दिवशी तीन ते चार लोकांना ब्रेन स्ट्रोकची लागण होते. याकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवावर बेततं. भारतीय लोक या स्ट्रोकविषयी आणि मेंदूमधील बिघाडाविषयी अनभिज्ञ असल्याचं सत्यही या सर्वेक्षणातून उघड झालं आहे. इतकंच नव्हे तर ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांना स्ट्रोकबाबत माहिती नसल्याची बाब उघड झाली आहे. अशा या ब्रेन स्ट्रोकची आपण माहिती करून घेऊया.

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?
मेंदूला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा न मिळाल्यामुळे मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी फाटली असता हा त्रास उद्भवू शकतो. यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणं आवश्यक आहे. याबाबत बहुसंख्य लोकांना माहिती नसते. चार तासांच्या आत विशिष्ट गुठळी कमी करण्याकरिता उपाय केले गेले नाहीत तर मृत्यू ओढवू शकतो.

बंगळूरुमधील ६८ टक्के लोकांना तर मुंबईतील ५८ टक्के लोकांना स्ट्रोकबाबत माहिती नाही. तर दिल्ली आणि कोलकात्यामधील नागरिकांना याबाबत माहिती नसल्याची बाब सर्वेक्षणात उघड झाली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळूरु, कोलकाता या शहरांतील २५-५० वयोगटांतील नागरिकांची सर्वेक्षणाकरिता मदत घेण्यात आली. स्ट्रोक ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. स्ट्रोकची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि स्ट्रोक झाल्यावर केली जाणारी तत्काळ उपाययोजना याविषयी जनजागृतीचा अभाव असल्याचे मत इंडियन स्ट्रोक असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. शिरीष हस्तक यांनी सांगितलं. जागतिक आकडेवारीनुसार, प्रतिवर्षी जगात २ कोटी लोकांना स्ट्रोकची बाधा होते. भारतात हे प्रमाण हळुवारपणे वाढत आहे. मलेरिया, क्षयरोग, एचआयव्ही-एड्सच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे. जीवनशैलीत बदल आणि थोडा व्यायाम करून या दोन्हींवर नियंत्रण मिळवता येतं.

लक्षणं
> डोळ्यांपुढे अंधारी येणं

> चालताना अडखळणं अथवा शरीराचं संतुलन बिघडणं

> बोलताना अडखळणं

> समरणशक्तीवर परिणाम होणं

> बधिरता येणं

> अशक्तपणा येणं

> धुरकट किंवा दुहेरी प्रतिमा दिसणं

> अचानक डोकेदुखी उद्भवणं

लहान स्वरूपाच्या स्ट्रोकमध्ये मात्र अशी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र तरीही मेंदूच्या पेशी निकामी करण्याचं काम होत असतं.

प्रतिबंधक उपाय
ब्रेन स्ट्रोकवर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. ते बदल कोणते ते पुढीलप्रमाणे -

>> आपल्याला असणाऱ्या उच्च रक्तदाबाची आपल्याला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तसंच त्यावर संयम कसा ठेवावा याचीही तितकीच माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून पटकन उपचार करता येऊ शकतो.

>> धूम्रपान टाळावं

>> कोलेस्टेरॉल वाढवणारे चरबीयुक्त पदार्थ टाळावेत

>> विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात

>> आहारात टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटोत अँटिऑक्सिडंट असल्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव होतो

>> अ‍ॅरोबिकसारखे व्यायाम नियमित करावेत

>> मानसिक ताणावर नियंत्रण ठेवावं

कोणाला होऊ शकतो?
0 ५५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कोणालाही

0 विशेषत: पुरुषांना

0 आनुवंशिकता असल्यास

0 उच्च रक्तदाब असलेल्यांना

0 शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असलेल्यांना

0 धूम्रपान करणा-यांना

0 मधुमेहाचे रुग्ण

0 माइल्ड स्ट्रोक अ‍ॅटॅक आलेले

0 नैराश्य आलेले किंवा मानसिक तणावाखाली असणारे

0 अल्कोहोलचं अतिरिक्त सेवन करणारे

Read More »

जाणूया आहारप्रणाली..

'अन्नदाता (शेतकरी) आणि अन्नपूर्णा (गृहिणी) सुखी भव!' असं आपल्या भारतीय परंपरेत म्हणण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. परंतु या दोघांच्याही कृपेनं आपल्याला मिळणा-याअन्नाचा आपण किती आदर करतो आणि त्याचा आपल्याला किती फायदा करून घेतो, याचं विचारमंथन करणं ही आजच्या काळात उद्भवलेली एक अत्यावश्यक गरज आहे. म्हणूनच जीवनशैली आणि आहाराची सांगड सोप्या आणि आरोग्यदायी पद्धतीनं कशी घालता येते, ते या सदरातून जाणून घेऊया..
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे दिवसभरात खायला सोपं आणि शक्य होत असेल तेव्हा खाणं, अशी आहाराची व्याख्या करावी लागेल. हे विधान बहुतांशी जरी खरं असलं, तरी आपल्याला माहीतच आहे, की मराठी वा इंग्रजी महिने बारा असले, तरी ऋतू केवळ सहाच आहेत. त्यानुसार प्रत्येक ऋतूत आपल्या अवती-भवतीच्या वातावरणात होणारा बदल हा अपरिहार्य असतो, ज्याचा मानवी शरीरावरही निश्चितच परिणाम होत असतो. या प्रत्येक ऋतूतील बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना, तसंच सर्वत्र प्रचंड प्रमाणात वाढलेल्या प्रदूषणात तग धरून सुदृढ आरोग्य टिकवायचं असेल, तर त्या-त्या ऋतुमानानुसार आहाराचंही नियोजन करणं अत्यावश्यक आहे. ऋतुमानानुसार आहार घेण्यासाठी आहारशास्त्र व आयुर्वेदशास्त्राने काही नियम, पथ्यं ठरवून दिली आहेत. ही आहारप्रणाली आणि त्याच्या पद्धती सर्वसमावेशकतेनं माहीत व्हाव्यात, यासाठी निसर्गानेच पूर्वपरंपरागत सणांचं प्रयोजन केलेलं आहे.

हल्ली मोठया प्रमाणावर शाकाहाराचा प्रचार व प्रसार सर्वत्रच होऊ लागला आहे. शाकाहारही मांसाहाराइतकाच ताकदीचा असू शकतो, हे पटवून देणं हाच याचा हेतू. हाच शाकाहार योग्य वेळी, संतुलित प्रमाणात घेतला तर तुम्ही चिरकाल आरोग्यदायी बनू शकता. यासाठी आपणच आपल्या खाण्या-पिण्याच्या वेळा जुळवून शक्य तितका पोषक आहार घेतला पाहिजे.

तुम्ही कितीही तणावजन्य मानसिकतेत, कितीही घाईगडबडीत असाल, तरीही सकाळी घराबाहेर पडताना, न काही खाता-पिता कधीही पडू नये. न्याहारीसाठी काहीच बनवायला मिळत नसेल वा निघण्याच्या घाईमुळे खायला जमत नसेल तर किमान दुधात पोहे (भाजलेले जाडे पोहे) घालून खावेत. हे बनवण्यासाठी वेळही लागत नाही आणि गॅसही खर्च होत नाही. सकाळच्या धावपळीत केल्या जाणाऱ्या न्याहारीसाठी घरामध्ये कायम फळ असणं केव्हाही सोयीचं. म्हणजे ऑफिससाठी तयार होताना, एखादं केळं, सफरचंद आणि एक पेला दूध प्यायलं, की दुपारच्या जेवणापर्यंतचा प्रश्न मिटला म्हणून समजा. मात्र, पोळी-भाजीचा डबा घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नये. सायंकाळच्या भुकेसाठीही आपल्यासोबत एखादं सफरचंद, राजगि-याची चिक्की, खाकरा (गुजराती खाद्यपदार्थ) असे पौष्टिक, डाएटसाठीही चांगले आणि सहजपणे कुठेही खाता येण्याजोगे पदार्थ ठेवावेत.

कधीही जास्त तास उपाशी राहू नये. त्यामुळे शरीरात पित्ताचा संचय होऊन, भुकेच्या वेळी शरीरात प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये वेळेवर अन्न न पडल्यास (पोटात भुकेने कावळे ओरडत असताना न खाणं) हे पित्त उग्ररूप धारण करून शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचून त्रासदायक ठरतं. प्रसंगी रोगकारक स्थितीही उद्भवते. आहाराच्या अयोग्य सेवनामुळे आम्लपित्तासारखी जगभर भेडसावणारी स्थिती शरीरात ठाण मांडून बसते. ज्यांना शक्य आहे, त्यांनी शरीराला संतुलित, चौरस आहार मिळेल अशा पूर्णान्नाचा डबा न्यावा. अधूनमधून वा सायंकाळी काहीतरी अरबट-चरबट खाणं तर टाळावंच, शिवाय हळूहळू चहा पिणंही कमी करावं आणि नंतर सोडावं. रात्रीच्या जेवणात तसंच एरव्हीही जास्त अतिमसालेदार वा पचायला जड अशा पदार्थाचा समावेश करू नये. जास्तीत जास्त सौम्य, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित, आनंदी ठेवणारा आहार घ्यावा.

त्याचप्रमाणे कुठेही बाहेर जाताना न विसरता स्वत:सोबत कोमट पाण्याची बाटली ठेवावी व घरी असतानाही फ्रीजचं थंडगार पाणी (जे तात्पुरता गारवा देऊन, शरीराचं तापमान वाढवतं) पिण्याऐवजी, कोमट पाणीच प्यावं. भूक असेल तितकंच खावं. प्रत्येक घास काटेकोरपणे चावून मगच गिळावा, म्हणजे अन्नात लाळ चांगल्या प्रकारे मिसळते. घरातल्या गृहिणीनं, आईनं अत्यंत प्रेमानं, कौटुंबिक आरोग्याच्या हिताचा विचार करूनच बनवलेल्या प्रत्येक पदार्थाचा आदर करावा. त्यांना नावं न ठेवता 'अन्न हे पूर्णब्रह्म..' असं समजूनच ते पदार्थ जसे झाले असतील, तसे आनंदाने स्वीकारावेत.

Read More »

ऑक्टोबर हिट तरी राहा फिट

२० ऑक्टोबरचा रविवार या वर्षीचा 'अतिउष्ण दिवस' म्हणून घोषित केला गेला. या हिटचे परिणाम शरीरावरही होऊ लागले आहेत. त्यामुळे रोज प्रवास करणा-यांनी, कामासाठी बाहेर फिरणा-यांनी, इतकंच नव्हे तर घरात राहणा-या महिला, लहान मुलं यांचीदेखील या उष्णतेमुळे शारीरिक क्षमता कमी होऊन शरीराला थकवा येतो आहे. अशा या बदलत्या वातावरणात स्वत:ची काळजी घेणं जरुरीचं झालं आहे.

'चुभती, जलती, गरमी का मोसम आया..', 'अरे किती किती ही उष्णता..', 'दुपारी चालता चालता डोळ्यांसमोर अचानक अंधारी आली आणि तिथेच खाली पडले..', 'दुपारी १२ नंतरच काय पण सकाळी १० नंतरही घराबाहेर पडायला नको..' अशी वाक्यं आता आपल्या कानावर पडायला लागली आहेत. येणाऱ्या थंडीपूर्वी समोरं जावं लागतंय ते ऑक्टोबर हिटला. ऑक्टोबर हिटचा त्रास होण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर संपत आला तरी अंगाची लाही लाही काही कमी झालेली नाही. गेल्या काही दिवसांतच तापमानात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.

धावत जाऊन ट्रेन पकडायची, रिक्षा, बससाठी तासन् तास तापत्या उन्हात उभं राहायचं, शिवाय कामासाठी होणारी धावपळ असतेच. मात्र ऑक्टोबरमध्ये या गोष्टी नकोशा वाटू लागतात. पावसामुळे थंडगार झालेली जमीन तापमानात झालेल्या वाढीमुळे लगेच तापते. बाहेर फिरताना याचा त्रास मोठया प्रमाणात जाणवतो. त्यामध्ये दिवाळीची तयारी सुरू असते. खरेदी करण्यासाठी सगळेच बाहेर पडतात. गर्दीच्या ठिकाणी अशा वातावरणात घुसमट होते, घामाच्या धारा वाहू लागतात. अतिप्रमाणात घाम वाहून गेल्यामुळे चक्कर येण्याचं प्रमाण वाढतं. आपण वातावरण काही बदलू शकत नाही. परंतु या वातावरणात आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता असते. रखरखत्या उन्हामुळे, अचानक वाढलेल्या तापमानामुळे शरीरातील ग्लुकोज, व्हिटॅमिन कमी होतं. शिवाय अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे आपल्या शरीराला त्या वातावरणाशी जुळवून घ्यायलाही थोडा त्रास होतो. त्यामुळे या दिवसांत आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. पण हो त्याला सामोरं जाऊन, स्वत:चं आरोग्य जपायला नक्कीच काळजी घेऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आपण जशी काळजी घेतो त्याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये काळजी घेणे आवश्यक असते.

काय कराल
>> बाहेर जाताना किंवा घरातही शक्यतो घट्ट कपडे घालणं टाळावं. सैल, वजनाने आणि रंगाने हलके असणाऱ्या कपडय़ांचा वापर जास्त करावा.

>> उन्हामध्ये शरीरातील उष्णताही वाढते. घामाच्या धारा वाहू लागतात. अशा वेळी ग्लुकॉन डी, इलेक्ट्रोल पावडरचं पाणी सोबत ठेवावं. त्यामुळे शरीरात थंडावा राहण्यास मदत होईल.

>> प्रखर उन्हातून प्रवास करताना चक्कर येण्याची शक्यता असते, त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन जी औषधे तत्काळ उपयोगी पडतील ती नेहमी सोबत ठेवावीत. शरीरातील शर्करेचं प्रमाण कमी होता कामा नये यासाठीच औषध नाही तर साखरेची पुडी किंवा लिमलेटच्या गोळ्यांचं पाकिटसुद्धा सोबत ठेवावं.

>> सकाळी अंघोळ करताना जास्त गरम किंवा अगदीच थंड पाण्याने आंघोळ करू नये. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. दिवसभर बाहेर फिरल्यामुळे घामाने शरीर चिकट होतं. त्यामुळे या दिवसांत रात्री पुन्हा अंघोळ करावी. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि दिवसभराचा ताण कमी होईल.

>> अशा उन्हात स्कीनची काळजी जास्त प्रमाणात घ्यावी. एसपीएफ असलेल्या क्रीम वापराव्यात. ज्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण होईल.

>> गाडी पार्क करताना ती सावली असेल अशा ठिकाणी पार्क करावी. त्यामध्ये असलेलं इंजिन आणि गाडीचा रंग भडक असेल तर त्यामुळे ती गाडी पटकन तापते. त्यामुळे प्रवास करताना त्याचा त्रास होतो. आणि जर गाडी तापलीच असेल तर त्या गाडीत दमट वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे अशा गाडीतून लहान मुलांना बाहेर नेणं टाळावं.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe