Tuesday, October 1, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

महत्त्व श्रेष्ठ दानाचं!

ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस रक्तदान दिन म्हणून ओळखला जातो. रक्तदानाचा अनुभव एक वेगळंच समाधान देऊन जातो. एका रक्तदात्यामुळे एक दुर्दैवी जीव वाचण्याची शक्यता निर्माण होते. रक्तदानासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही. रक्तदानाची नेमकी प्रक्रिया काय असते ते जाणून घेऊ.

रक्तदान करताना सर्वात आधी रक्तदात्याची शारीरिक तपासणी केली जाते. मग घेतलेल्या रक्ताची घनता आणि त्यातील हिमोग्लोबिनचं प्रमाण तपासलं जातं. या तपासणीत दाता सक्षम असल्याची डॉक्टरांची खात्री झाल्यानंतरच रक्त घेतलं जातं. एकावेळेस साधारण दोन५० ते ३०० मिली इतकं रक्त काढलं जातं.

रक्तदानाचे फायदे

>> शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते.

>> रक्तदानाचं 'ब्लड डोनर'कार्ड मिळतं. आवश्यकता पडल्यास त्या कार्डावरून दात्याला विनामूल्य रक्त मिळतं.

>> तुमच्या रक्तदान दुस-या रुग्णांसाठी जीवनदायी वरदान ठरतं.


दान केलेल्या रक्ताचं पुढं काय होतं?

रक्तपेढयांमध्ये दान केलेल्या रक्ताचा गट निश्चित केला जातो. त्यानंतर रक्ताच्या एचआयव्ही, कावीळ इत्यादी आजारांच्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांनंतर रक्त रक्तपेढयांमधून वेगळं केलं जातं. काही वेळा रक्तातील विविध घटक वेगळे केले जातात. जसं की, फ्रेश फ्रोझन प्लाज्मा, पॅकसेल ब्लड, सिरम इत्यादी. भाजलेले रुग्ण, अतिरक्तस्राव झालेले रुग्ण, गंभीर अत्यवस्थ रुग्ण यांना हे रक्त दिले जातं.


रक्तदानानंतरची काळजी

>> रक्तदानानंतर लगेच शारीरिक श्रम, खेळणं, धावणं यापासून दूर राहावं.

>> रक्तदानानंतर कमीत कमी ४८ तासांपर्यंत तरी मद्यपान करू नये.

>> रक्तदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं जड वाहन चालवू नये.

>> भरपूर पाणी प्यावं.

>> रक्तदानानंतर काही त्रास झाल्यास लगेचच रक्तपेढीच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
रक्तदान कुठे करावं?

>> कोणत्याही शासकीय रुग्णालयातील महानगरपालिका, रुग्णालय ज्या ठिकाणी रक्तपेढीची सोय आहे, त्या ठिकाणी करावं.

>> शासनमान्य उपक्रमाद्वारे घेतलेलं रक्तदान शिबीर.

>> खाजगी रक्तपेढया, सेवाभावी संस्थांतर्गत चालवण्यात येणा-या रक्तपेढया. कोणी करावं?

>> एक८ ते ६० वर्षापर्यंतची कुठलीही सुदृढ व्यक्ती रक्तदान करू शकते.

>> मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार नसलेल्या व्यक्ती.

>> रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य असेल तरच.

>> वजन ४५ किलोपेक्षा जास्त असलेली व्यक्ती

>> कोणताही वैद्यकीय उपचार चालू नसलेली व्यक्ती कोणी करू नये?

>> आजारी आणि अशक्त व्यक्ती.

>> एचआयव्ही आणि रक्ताची कावीळ झालेल्या व्यक्ती.

>> गरोदर स्त्रिया, ओल्या बाळंतिणी.

>> तीन महिन्यांत रक्तदान केलेलं असल्यास.

>> ४८ तासांपूर्वी रक्तदान केलेलं असल्यास.

>> मलेरिया, टी. बी. यांसारख्या संसर्गजन्य रोगाने बाधित व्यक्ती.

>> रक्त गोठण्यासंदर्भातील आजारी व्यक्तींनी.

Read More »

विविध चवींचा मका!

मका हे धान्य माहीत नाही, अशी व्यक्ती विरळाच. संपूर्ण जगात मक्याचं उत्पादन केलं जातं. मेक्सिकोत प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी मक्याचा वापर केला जातो. आपल्याकडेही मक्याची भाकरी, सूप, भाजी, केली जाते. मका उकडून किंवा भाजूनदेखील खाल्ला जातो. मात्र मक्यापासून अप्पे, शिरा, भेळ यांसारखे पदार्थही केले जातात. तोही त्यातील पौष्टिकपणा टिकवून. मक्यापासून बनवलेल्या पौष्टिक पदार्थाविषयी..

संपूर्ण जगात मक्याचं उत्पादन घेतलं जात असलं तरी अमेरिकेत मका जास्त प्रमाणात पिकतो. आपल्याकडे भारतात पंजाबी लोक मक्याचे पदार्थ भरपूर खातात. मक्याच्या कणसात चांगल्या दर्जाची कबरेदकं, प्रथिनं आणि तंतुमय घटक आहेत. मक्का हे धान्य पचायला भरपूर जड आहे. तरीही मक्याच्या कणसाकडे पूर्णान्न म्हणून पाहिलं जातं. या कणसामध्ये प्रथिनं, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी शरीरास उपयोगी असणारी द्रव्यंही आहेत. ताज्या मक्यापासून बनवलेले पदार्थ चविष्ट लागतात.

अप्पे

साहित्य : एक वाटी साध्या मक्याच्या कणसाचा कीस, अर्धी वाटी कुठल्याही लाह्या (शक्यतो राजगि-याच्या लाह्या खाव्यात), अर्धी वाटी रवा, चमचाभर बारीक वाटलेल्या आल्याची चटणी, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल, मीठ आणि फोडणीचं साहित्य.

कृती : लाह्यांचं पीठ करून घ्यावं. रवा भाजून घ्यावा. कणसांचा कीस, रवा आणि लाह्यांचं पीठ एकत्र करावं. त्यात आल्याची चटणी, मिरच्या आणि मीठ घालावं. पाणी घालून इडलीला भिजवतो त्याप्रमाणे मिश्रण सैल करावं. चमचाभर तेलावर जिरे, मोहरी, किंचित हळद, हिंग आणि हाताने कुस्करलेला कढीपत्ता यांची फोडणी पिठाला द्यावी. पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. मिश्रण तासाभरासाठी भिजवून ठेवावं. अप्पे पात्राला तेल लावून अप्पे काढावेत.

फायदे : वर सांगितल्याप्रमाणे मक्याच्या पदार्थात पौष्टिक गुणधर्म तर आहेतच, शिवाय यात वापरलेल्या भाज्यांमुळे मक्यामध्ये शरीरासाठी लागणारी तंतूमय पदार्थाची गरज भरून निघते. राजगि-यामुळे पदार्थ बांधीव होतो.


मक्याची डाळ

साहित्य : दोन वाटया मक्याचा कीस, दोन-तीन मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, साखर, तेल, फोडणीचं साहित्य, ओलं खोबरं, दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, मीठ.

कृती : कढईत चमचाभर तेलावर मोहरी, जिरे, हळद, हिंग, कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. बारीक कापलेला कांदाही त्यात परतून घालावा. फोडणी मक्याचं कीस घालून परतावी. फोडणीवर झाकण ठेवावं. मीठ, साखर घालून परतून घ्यावी. गरज पडल्यास फोडणीत छोटी अर्धी वाटी गरम पाणी घालावं. फोडणी पुन्हा एकदा परतावी. चांगली वाफ आल्यावर उतरावी. फोडणीत खोबरं आणि कोथिंबीर घालावी.

टीप : याच डाळीत थोडी हरभ-याची भिजवून वाटलेली डाळ किंवा तुपावर खमंग भाजलेला थोडा तांदळाचा रवाही घालता येईल. तांदळाचा रवा घालण्याआधी तो साधा भाजून घ्यावा. मग हा भाजलेला रवा तुपावर खमंग खरपूस भाजून घ्यावा. मक्याच्या किसात हा खमंग भाजलेला रवा घालताना त्यात वाटीभर गरम पाणी घालावं. म्हणजे रवा चांगला शिजून येईल.

फायदे : बारीक चिरलेल्या कांद्यामुळे पदार्थाला हलकेपणा येऊन हा पदार्थ सहजच पचेल. यात जर हरभ-याची डाळ घातल्यास शरीराला चांगल्या दर्जाची प्रथिनं मिळतील. डाळीत असणारं बी कॉम्प्लेक्सही शरीराला मिळेल. तर तांदळामुळे शरीराला हवा असणारा कबरेदकांचा पुरवठा होईल. या दोन्ही पदार्थामुळे शरीरातील 'अ', 'ब' आणि 'क'ची कमतरता भरून येईल. खोब-यामुळे पदार्थ चविष्ट लागतो. तसंच शरीराला गरजेची असणारी स्निग्धताही मिळेल. केसांच्या वाढीसाठी खोबरं उत्तम आहे.


मक्याच्या दाण्यांची भेळ

साहित्य : दोन वाटया स्वीटकॉर्नचे दाणे, लोणी, एक मूठ पुदिन्याची हिरवी पाने, लसणाच्या पाकळया, मिरेपूड, मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : मक्याचे दाणे कुकरमधून वाफवून घ्यावेत. पुदिना, लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा. कढईत अर्धा चमचा लोणी घालावं. लोणी वितळल्यावर त्यात मक्याचे दाणे परतून घ्यावेत. दाणे वातूळ होऊ नयेत म्हणून त्यावर थोडा गरम पाण्याचा हबका मारावा. वाफ आल्यावर सर्व मसाले घालावेत. नंतर त्यात मीठ, साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. वरून लोणी घालावं. गरम किंवा थंड कशीही मक्याची भेळ सव्‍‌र्ह करावी.

फायदे : दोन जेवणामध्ये एक छोटीशी भूक असते. त्या दरम्यान हा पदार्थ खावा. मका पचायला जड आहे. लसूण हृदयासाठी गुणकारी असून तो वातशामक आहे. मक्याच्या पदार्थात लसूण घातल्यामुळे पदार्थातील वातूळपणाचा गुणधर्म निघून जातो. पुदिना पाचक आहे. पुदिन्यामुळे मक्याचं पचन जलद होतं. पुदिन्यामुळेही शरीरातील विजातीय घटक (अँटि ऑक्सिडंट) कमी होतात. पुदिन्यामध्ये 'लोह' आणि कॅल्शियमचं प्रमाणही भरपूर आहे.


मक्याचा शिरा

साहित्य : दोन वाटया मक्याचा कीस, अर्धी वाटी मकाणे, तूप, केशर, वेलची, सूर्यफुलाच्या बिया, भोपळयाच्या बिया, बदाम, थोडंसं दूध, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी खजूर.

कृती : मकाणे किंचित तुपावर भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक करून घ्यावेत. सूर्यफूल तसंच भोपळयाच्या बियांमधला गर, बदाम आदल्या रात्री भिजत घालावेत. हा भिजवलेला ओला-सुका मेवा तुपावर छान परतून घ्यावा. तो एका वाडग्यात काढून घ्यावा. एक चमचा तुपावर मक्याचा कीस परतून घ्यावा. छान परतला गेल्यावर त्यात दूध घालावं. कढईवर झाकण ठेवावं. नंतर साखर घालून अधूनमधून ढवळून घ्यावं. साखर आहळली की, त्यात मकाण्याची पूड, तुपात परतलेला सुकामेवा घालावा. केशराच्या काडया चुरून घालाव्यात. वेलची पूड घालावी. खजुराचे तुकडे बारीक करून घालावेत. सगळं एकत्र करून पातेल्यावर झाकण ठेवावं. छान वाफ आल्यावर उतरावं.

फायदे : एक पौष्टिक रेसिपी म्हणून या पदार्थाकडे पाहावं. सकाळच्या नाश्त्यात जर हा शिरा खाल्ला आणि त्यावर ग्लासभर दूध प्यायल्यास दुपारी दोन ते तीनपर्यंत काही खाण्याची गरज पडणार नाही. हा पदार्थ म्हणजे एका वेळच्या पूर्ण जेवणासारखा पदार्थ आहे. दुधामुळे पदार्थाला हलकेपणा येतो. सूर्यफुलाच्या बीमध्ये उत्तम दर्जाची प्रथिनं, पायरीडॉक्सिन नावाचं 'ब' गटातील 'ब-६' जीवनसत्त्व आहे. या बिया चवीने रुचकर असतात. बियांमुळे शरीरातील विजातीय द्रव्य (अँटिऑक्सिडंट) कमी होतात. भोपळा आणि सूर्यफुलाच्या बियांमुळे शरीरातील वाईट दर्जाचे कॉलेस्टेरॉल कमी होते. कॅन्सरला प्रभावित करणारे घटकही कमी होतात.


गुलाबजाम

साहित्य : एक वाटी कोवळया पांढ-या कणसाचा गर, एक वाटी मावा, दोन चमचे मक्याचं पीठ, चिमूटभर बेकिंग पावडर, दीड वाटी साखर, गुलाब पाकळयांची पावडर, वेलची आणि जायफळ पूड, थोडंसं केशर.

कृती : प्रथम मक्याचं कणीस किसून त्याचा गर काढून घ्यावा. त्या गरात एक वाटी मावा किसून घालावा. दोन मोठे चमचे मक्याचं पीठ घालावं. किंचित मीठ आणि चिमूटभर बेकिंग पावडर घालावी. मिश्रण हलक्या हाताने एकजीव करावं. मिश्रणाचे छोटे छोटे लांबट गोळे करून ते तुपावर तळून घ्यावेत. दीड वाटी साखरेत अर्धी वाटी पाणी घालून पाक तयार करावा. पाकात वेलची-जायफळ पूड, केशर आणि गुलाब पाकळयांची पूड घालावी. तुपात तळलेले गुलाबजाम किमान तासभर तरी पाकात मुरू द्यावेत.

Read More »

ज्येष्ठ नागरिक कथा आणि व्यथा

टीव्हीवरील एका मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत एक वृद्ध गृहस्थ सतत तरुणांशी मैत्री ठेवून त्यांच्यात रमण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तरुण नसूनही चैतन्य आणि स्फूर्तीची अजिबात कमी नसणारे असे कित्येक ज्येष्ठ नागरिक आपल्या भोवतालीदेखील वावरताना दिसतात. त्यांच्या अंतरंगात दु:ख नसतं असं नसतं. मात्र 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीप्रमाणे ज्येष्ठांच्या समस्याही त्यांच्या वयानुसार आणि कौटुंबिक स्थितीनुसार वेगवेगळ्या असतात. मुळात ज्येष्ठ नागरिकांनी नव्या पिढीकडे मोकळाढाकळा दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास आणि तरुणांनीही त्यांना समजून घेतल्यास समस्यांची तीव्रताही कमी होईल.

एक ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचेदेखील तीन प्रकार असतात. साधारण ५८ ते ६५ वयोगट, ६५ ते ७५ वयोगट आणि ७५ आणि त्यापुढील वयोगट अशा तीन प्रकारांत ज्येष्ठांची विभागणी होते. आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे वयोमर्यादा वाढली आहे, त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. पण वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे. या समस्यांचेही अनेक पैलू आहेत. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा स्वरूपाच्या या समस्या असतात. वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात. शारीरिक व्याधींसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते. पण बाकी समस्यांसाठी समुपदेशन प्रभावी ठरू शकते.

दोन पिढयांतील अंतर व त्यातून निर्माण होणारे ताणतणाव याचा सामना दोन्ही पिढयांना करावा लागतो आहे. मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गात चंगळवाद आणि स्वकेंद्रीपणा पराकोटीचा वाढला आहे. त्यामुळे कुटुंब एकत्र राहत असले तरीही 'मी' माझे एवढेच पाहिले जाते. प्रत्येक वेळी स्वत:चा विचार केला जातो. ही वृत्ती संयुक्त कुटुंबासाठी घातक असते. यातून मग पुढे वृद्धांना मानसिक आणि सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं.

एकत्र कुटुंब असूनही निराश होणारे ज्येष्ठ नागरिक कमी नाहीत. भारतीय कुटुंबव्यवस्थेचं सर्वत्र कौतुक केलं जातं. एकत्र कुटुंब पद्धतीत लहान मुलं, तरुण, मध्यमवयीन व ज्येष्ठ स्त्री, पुरुष गुण्यागोविदांने एकत्र राहत असतात. त्याचे आपण गोडवे गात असतो आणि भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे असं मानतो. प्रत्यक्षात सून आणि सासू एकमेकांशी बोलत नाहीत असंही दिसतं. नातवंडांचं आजी-आजोबांशी पटत नाही. त्यामुळे पुरुषांची द्विधा मन:स्थिती होते. एकीकडे जन्मदाते आई-वडील यांचा मान राखावा दुसरीकडे जिच्याबरोबर जन्म काढायचा त्या दुस-या घरातून आलेल्या बायकोशी जमवून घेण्याची तारेवरची कसरत करावी लागते. समाजात आपलं आदर्श संयुक्त कुटुंब आहे असं भासवत जगावं लागतं. मनाला मुरड घालावी लागते. सर्वाना विभक्त होण्याएवढी ऐपत नसते. परंपरा-रूढी म्हणून कुटुंब एकत्र राहत असतं. पोस्टासाठी त्यांचा पत्ता एक असतो. मात्र त्या घरात विविध बेटं तयार झालेली असतात. मुलगा, सून आणि त्यांची मुलं हे एक युनिट, तर आजी-आजोबा हे दुसरं युनिट. कधी यात अविवाहित मुलगा किंवा मुलगी यांचा समावेश असतो. अशा वेळी आर्थिकदृष्टया स्वतंत्र असणा-या ज्येष्ठ नागरिक स्त्री-पुरुषांची कमी कुचंबणा होते. पती निधनानंतर कुटुंबात एकटी पडलेली विधवा असेल तर राहतं घर तिच्या नावावर असल्यास अशी ज्येष्ठ स्त्री मानहानीचा सामना करू शकते.

भारतीय संस्कृतीत वर्णाश्रमाला महत्त्व आहे. एक ते २५ वर्ष ब्रह्मचर्य, २५ ते ५० वर्ष गृहस्थाश्रम, ५० ते ७५ वर्ष वानप्रस्थाश्रम त्यानंतर ७५ ते १०० वयात संन्यास अशा या स्थिती आहेत. बहुतांश ज्येष्ठ नागरिक वानप्रस्थाश्रमाच्या पुढे गेलेले असतात, पण त्यांची जीवनासक्ती संपलेली नसते. खाणं, पिणं, कपडालत्ता, दागदागिने, प्रवास, लग्न, मुंज, सणवार अशा सर्व गोष्टींत त्यांचा उत्साह टिकून असतो. मग असे ज्येष्ठ मनोमन स्वत:ची तरुण पिढीशी तुलना करतात. बरोबरी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो. ते शक्य न झाल्यास काही जणांकडून तरुण पिढीवर टीका केली जाते. यात ब-याचदा हेवेदावेही डोकावतात. आपल्या संस्कृतीमधील वर्णाश्रमाच्या या नियमांचा अवलंब करत संसाराची लालसा वृद्धांनी कमी करावी. त्यामुळे आपोआपच कुटुंबात समाधान राहील.

काही घरांमध्ये तरुण पिढीने व्यक्तिस्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ घेतलेला आढळतो. अशा घरात मग ज्येष्ठ आणि तरुण यांच्या चकमकी झडतात.घरात पुरेसं लक्ष न देणा-या किंवा देऊ न शकणा-या तरुण सदस्यांना वृद्ध व्यक्तींचे विचार पटत नाहीत. पण क्षुल्लक खटक्यांची कटुता कायम राहणार नाही याची दक्षता उभय पक्षांनी घेणे आवश्यक आहे. काही घरांत टीव्ही भांडणाला कारण होतो. ज्येष्ठांना बातम्या, न्यूज चॅनल हवे असतात. तर नातवंडांना हिंदी सिनेमा, कार्टूनची आवड असते. त्यांना जेवणात रोज पंजाबी, चायनीज पदार्थ हवे असतात. तर ज्येष्ठांना पारंपरिक भात-भाजी हवी असते. आरोग्यदायी खाण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. कुटुंबात शिळं अन्न खायला कोणीच तयार नाही. नवीन कार्यपद्धतींमुळे जीवनशैलीही बदलत चालल्या आहेत. पैशाची आवक वाढवण्याच्या नादात घर संकल्पना नामशेष होते आहे. 'घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती' हा सुविचार केवळ भिंतीवर शोभा वाढवण्यासाठी लावला जातो. प्रत्यक्षात घरातील चार लोकांची तोंडं चार दिशांना असतात, असंही काही कुटुंबांत आढळून येतं. काही घरांत ज्येष्ठ नागरिक तडजोड करायला तयार नसतात. वर्तमानपत्र प्रथम वाचणार, स्नानास प्रथम जाणार, सतत चौकशा करणार, दुस-यांना उपदेश करणार, हातात देवाचं पुस्तक लक्ष मात्र दुसरीकडे, असं त्यांचं वागणं असतं. निष्काम कर्मयोगाच्या गोष्टी तोंडात, आचरण मात्र सकाम असं काही ज्येष्ठांचं वागणं दिसतं. अशा कुटुंबांमध्ये तरुणांना योग्य ते मार्गदर्शन करून ज्येष्ठ नागरिकांनी थोडं झुकतं माप घ्यायला हरकत नाही. त्यांनी वाणीचा कमीत कमी वापर करावा. नामस्मरण सतत करावं. आशीर्वाद देण्यासाठी हाताचा वापर करावा. नवीन पिढीला त्यांचा मता आणि मनाप्रमाणे संसार करू द्यावा. संसारातील लक्ष कमी करून परमार्थाकडे लक्ष लावावं, अशा प्रकारे आपलं आचरण ठेवावं. स्वत:पण आनंदी राहून बोनस मिळालेलं आयुष्य सत्कारणी लावावं. असे ज्येष्ठ नागरिक समाजात सर्वाना हवेहवेसे वाटतील.

न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा।
वृद्धा न ते ये न वदान्ति धर्मम्।।

ज्या सभेत वृद्ध, अनुभवी लोक नसतील ती सभा नव्हे. जे धर्म सांगत नाहीत ते वृद्धच नव्हेत.अशा प्रकारे महाभारतात वृद्धांचा गौरव केलेला आहे. तोच वारसा आपण पुढे चालवला पाहिजे. वृद्धाश्रम हा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येवरील शेवटचा उपाय समजला जावा.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe