| ||||
![]() 'गुण'कारी पालेभाज्या
मुंबईत वा मुंबईच्या आसपास डोकावल्यास आपल्या लक्षात येईल की, आपल्या अवती-भवती आहारात समावेश करण्याजोग्या ब-याच प्रकारच्या पालेभाज्या, रानभाज्या आहेत. काही परिचित, काही ऋतूमानानुसार मिळणा-या, काही अत्यंत दुर्मीळ आणि तितक्याच 'गुण'वान, तर काही रानोमाळातल्या.. परंतु त्यांचं महत्त्व केवळ आदिवासी पाडयांपुरतंच मर्यादित राहिलं नाही. जागरूक खवय्यांमुळे त्या सर्वत्र मिळू लागल्या आहेत. अशा मर्यादित काळापुरत्याच मिळणा-या, परंतु शरीराला पोषकद्रव्य देणा-या हिवाळ्यातील गुणकारी पालेभाज्यांविषयी.. पालेभाज्या या अत्यंत आरोग्यदायी आणि इतर भाज्यांच्या तुलनेत स्वस्तही आहेत. पालक, हिरवा आणि लाल माठ, चवळी / चवळाई, मेथी, कोथिंबीर इत्यादी पालेभाज्यांच्या केवळ पानांचाच वापर होतो व त्यांचे देठ फेकून दिल्याने देठातील जीवनसत्त्वं वाया जातात. अशा पालेभाज्यांचे कोवळे देठ फेकून न देता, तेही बारीक चिरून भाजीत जरूर वापरावेत. पानांतली सर्व जीवनसत्त्वं (अ, ब, क, फॉलिक अॅसिड इ.) आणि क्षार (लोह, कॅल्शियम, फॉस्फरस) हे घटक देठातही विपुल प्रमाणात असतात. देठात चोथा (फायबर) मोठया प्रमाणात असतो. चोथा हा आरोग्यदृष्टया अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तो रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम करतो. पालेभाज्यांचे नुसते देठच इतके महत्त्वपूर्ण असताना, ते केरात टाकून फुकट का बरं घालवायचे? पालेभाज्यांचं वैशिष्टय म्हणजे त्यात लवण व क्षार (कॅल्शियम, फॉस्फरस), लोह, जीवनसत्त्व अ, ब, रायबो फ्लेविन (बी १ ते बी १२ यांपैकी एक जीवनसत्त्व) आणि फॉलिक आम्ल ही जीवनसत्त्वं मुबलक प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक एकाच पदार्थात मिळणं, हा उत्तम योगायोग आणि गरिबाच्या खिशाला परवडणारी बहुमोल निसर्गदत्त देणगीही म्हणता येईल. पालेभाज्या खाल्ल्याने त्यातील तंतुमय पदार्थामुळे आतडयांची हालचाल चांगली होऊन आतडयांमध्ये चिकटलेले आम्लजन्य पदार्थ आणि विषद्रव्य मलाद्वारे शरीराबाहेर टाकली जातात. कॅल्शिअम आणि फॉस्फरसमुळे हाडं आणि दातही बळकट होण्यास व निरोगी राहण्यास मदत होते. करडईची भाजी ही फक्त हिवाळ्यातच येते, त्यात हृदय संरक्षक तत्त्व आहे. ही भाजी उष्ण गुणात्मक आहे. वर्षातून केवळ हिवाळ्यातच या भाजीचा हंगाम असतो. जोपर्यंत ही पालेभाजी उपलब्ध होत असेल, तोपर्यंत आठवडयातून किमान दोन वेळा तरी आवर्जून खावी. तसंच चंदनबटवा, चाकवत या दुर्मीळ पालेभाज्याही हिवाळ्यातच मिळतात. या दोन्ही भाज्यांमध्ये कॅन्सररोधक घटक असतात. स्वादुपिंडाचं कार्य सुरळीत सुरू ठेवत असल्यानं मधुमेहींसाठी उत्तम वरदान असलेली पालेभाजी म्हणजे मेथी. गुडघे व सांध्यांचे संरक्षक गुण असलेल्या घटकांचाही मेथीत समावेश असतो. मेथी तसंच शेपूची भाजी पित्तवर्धक व उष्ण गुणात्मक असल्यामुळे ती थंडीच्या दिवसात खाणं उत्तम. बीट रूटच्या पानांमध्ये प्रचंड प्रमाणात लोह, कॅल्शिअम, जीवनसत्त्व अ आणि क यांशिवाय कॅन्सररोधक घटक तत्त्वही आहेत. बीट रूटसह नवलकोलाच्या भाजीची पानंही किमान अर्धा तास हळद व मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवून, मग ती साध्या पाण्यात वाफवून घेऊन त्यांचा शक्यतो पराठयांमध्ये वापर करावा. (कारण या पानांवर फवारण्यात आलेली विषारी कीटकनाशकं हळद-मिठाच्या पाण्यात ठेवल्याने ब-याच प्रमाणात निघून जातात व भाजी शिजवण्यायोग्य होते.) पालेभाज्या खाताना लहान मुलंच काय, पण बरीच ज्येष्ठ मंडळीही नाकं मुरडताना दिसतात. मग अशा वेळी पौष्टिक गुणधर्म असलेल्या या पालेभाज्या अतिशय चतुराईनं आपल्या कुटुंबीयांना खाऊ घालणं, हे खरं तर घरातील स्त्रीचं कौशल्य! अशा समस्त स्त्री वर्गाला एक पौष्टिक पर्याय असलेली पाककृती देत आहे. हे अवश्य करा.. >> पावसाळ्यात पालेभाज्या चांगल्या होऊनही त्या लवकर खराब होत असल्याने त्या खाल्ल्या जात नाहीत. परंतु हिवाळ्यात चांगल्या दर्जाच्या पालेभाज्या येत असल्याने आठडयातून किमान तीन दिवस तरी त्या जरूर खाव्यात. >> मिश्र भाज्या वा पालेभाज्यांच्या विविध प्रकारच्या सुपांमध्ये तसेच रस्सा भाजीतही या देठांच्या गराचा दाटपणा आणण्यासाठीही उपयोग होऊ शकतो. >> मुतखडयाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी पालक आणि मेथी या दोन्ही पालेभाज्या शक्यतो खाऊ नयेत. खाल्ल्यास भरपूर पाणी प्यावं. >> सर्व प्रकारच्या भाज्या, कंदमुळं, पालेभाज्या, फळं, धान्य, कडधान्यं विपुल प्रमाणात खावीत. Read More »![]() हेल्दी पराठा
थी, पालक, चवळाई, लाल माठ, मुळा व शेपू या सर्व पालेभाज्यांची निवडून, स्वच्छ धुतलेली पानं प्रत्येकी कणकेसाठी : सोयाबीन, तांदूळ, ज्वारी, चणाडाळ यांची पीठं प्रत्येकी अर्धी वाटी, मळण्यासाठी अर्धा कप दूध व पाणी. पराठा भाजण्यासाठी लोणी किंवा साजूक तूप. कृती : स्वच्छ धुऊन घेतलेल्या सर्व पालेभाज्यांची पानं बारीक चिरून प्रमाणानुसार दिलेल्या पिठांमध्ये एकत्रित करावीत. इतर सर्व कोरडे जिन्नसही प्रमाणानुसार एकत्र करावेत. मग त्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट, थोठ-थोडं पाणी व दूध मिसळत घट्टसर कणिक मळून घ्यावी. मध्यम जाडसर आकाराचे पराठे लाटून, तव्यावर लोणी वा तूप सोडून खरपूस भाजून घ्यावेत. गोडसर दह्यासोबत खायला द्यावेत. साधारण २-३ पराठे हे ही परिपूर्ण न्याहारी वा जेवणही होऊ शकते. Read More »![]() एड्स जाणा एड्स टाळा
एड्स हा खूप भयानक आजार आहे, परंतु याची जाण असेल तर एड्स टाळताही येतो. नुकत्याच झालेल्या एड्स दिनानिमित्त एड्सची माहिती सांगणारा हा लेख.. एड्स असो वा कोणताही भयंकर आजार किंवा व्याधी असो, याची पूर्व माहिती प्रत्येकाला असावयास हवी. या आजाराची माहिती सर्व ठिकाणच्या शासकीय व पालिकांच्या दवाखान्यात मोफत स्वरूपात मिळते. मात्र याबाबतीत जनमानसात पाहिजे तेवढी जागृती नाही. म्हणून समाजात भयानक व्याधी डोके वर काढत आहेत. आजारांची माहिती झाल्यावर त्या आजाराला सहज टाळता येते किंवा झालेला आजार आहे त्या स्थितीत स्थिर तरी ठेवता येतो. मात्र त्यासाठी त्या आजाराबाबत पूर्ण माहिती व उपाय जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एड्सबाबत खाली माहिती निश्चित प्रबोधनात्मक ठरेल असे वाटते. एड्स म्हणजे काय? मानवी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे निर्माण होणा-या रोगलक्षणांचा समूह म्हणजे एड्स होय. एड्स म्हणजे अॅक्वायर्ड- संपादित केलेला, इम्यूनो- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, डेफिशियन्सी – कमतरता, सिंड्रोम – लक्षण समूह होय. एच. आय. व्ही. विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर हा टप्पा लगेचच सुरू होतो व काही आठवडे राहतो. एच.आय.व्ही संक्रमित व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसते. हा कालावधी तीन महिने ते १५ वर्षे असू शकतो. तो व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर अवलंबून असतो. एड्स झाल्याचे कोणत्या अवस्थेत समजते ? एच.आय.व्ही.चा विषाणू शरीरात रोगप्रतिकारक संस्थेच्या पेशीवर हल्ला करून त्या नष्ट करतो. नष्ट झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी वेगाने निर्माण होत नाही. या पेशींच्या कमतरतेमुळे बाधित व्यक्ती क्षयरोग, कँडिडियासीस, नागीण इत्यादी विविध संक्रमणांमुळे आजारी होते. एच.आय.व्ही. संक्रमणाची अंतिम टप्प्याची म्हणजेच एड्सची सुरुवात येथून होते. तोपर्यंत बाधित व्यक्ती तिस-या अवस्थेत असते. लक्षणे > बाधित व्यक्तीचे वजन शेकडा दहा टक्क्याने कमी होते. > एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ सतत जुलाब होतात. > एक महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला येतो. > अंगावरील त्वचेवर वारंवार खाज येते. > बाधित व्यक्तीच्या तोंडात व घशात फोड येतात. > लसिका ग्रंथींची सूज जास्त काळ राहते ही प्रमुख लक्षणे ज्या व्यक्तीत दिसतात ती एड्सग्रस्त व्यक्ती समजावी. एड्स कसा पसरतो? एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास एड्स पसरतो. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीची इंजेक्शन व सुई अबाधित व्यक्तीसाठी वापरल्यास एड्स पसरतो. तसंच एच.आय.व्ही. बाधित रक्त दिल्यासही एड्स पसरतो. एच.आय.व्ही. बाधित पालकांकडून त्यांच्या नवजात अर्भकासही होऊ शकतो. एड्स कसा टाळता येतो? एड्स सहज टाळता येऊ शकतो. यासाठी खालील बाबींची काळजी घेतल्यास एड्स टाळणे प्रत्येकाला शक्य आहे. > रक्त घेण्याची वेळ आली तर एच.आय.व्ही. मुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा. > इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरींज आणि सुईचा वापर करावा. > गुप्तरोग झाला असल्यास त्यावर डॉक्टरकडे जाऊन त्वरित उपचार करावा. > पालकांकडून बाळाकडे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व प्रकारची उपाययोजना करावी. दाढी- कटिंग करताना न्हाव्यालासुद्धा नवीन ब्लेड वापरण्याचा हट्ट धरणे. एड्सग्रस्ताचे नेलकटर व ब्लेड वापरू नये, कारण यामुळे एड्स होण्याची शक्यता असते. खालील गोष्टींमुळे एच.आय.व्ही. प्रसार होत नाही एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने एड्स होत नाही. तसेच त्या व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, गळाभेट घेतल्याने किंवा एड्स बाधित व्यक्तीला डसलेला डास अबाधित व्यक्तीला चावला तरी एड्स होत नाही. याशिवाय एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीसोबत जेवण केल्यास किंवा त्या व्यक्तीची भांडी वापरल्याने तसेच कपडे वापरल्याने किंवा एकाच स्नानगृहाचा किंवा शौचालयाचा वापर केल्यानेही एड्स होत नाही. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीची सेवा-शुश्रुषा केल्यानेही एड्स होत नाही. एड्स झाल्यास लपवून ठेवू नये बरेच रुग्ण एड्स झाल्याचे निदान होताच तो लपवून ठेवतात हे योग्य नाही. त्याने घरातील सदस्यांना याबाबत माहिती द्यावी व उपाययोजना व उपचार करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. एड्स लपवणे म्हणजे या आजाराची दुस-याला बाधा करणे होय. याशिवाय सरकारी दवाखाने, उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी एड्सबाबत समुपदेशन केंद्रे आहेत. तिथे जाऊन ही माहिती घ्यावी. एड्सची माहिती जाणा आणि एड्स टाळा. कारण एड्सची माहितीच एड्सपासून बचाव करू शकते कारण यावर औषध नाही. औषध म्हणजे एड्सची पूर्ण माहिती जाणून घेणे. ए.आर.टी. उपचार केंद्रात रुग्णांनी जाऊन जीवनमान सुधारावे. एच.आय.व्ही. एड्ससंबंधी गैरसमजुती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी लोकांना अचूक व संपूर्ण माहिती व प्रबोधनावर अधिक भर द्यावा. यामुळे लोकांना या रोगाचे गांभीर्य कळेल व ते गैरमार्ग टाळतील. जागतिक एड्स दिन १ डिसेंबर, स्वैच्छिक रक्तदान दिन १ ऑक्टोबर आणि कुटुंब कल्याण जागृती पंधरवडा इत्यादी कार्यक्रमांतून लोकांमध्ये जनजागृती मोहीम पुढे नेण्यासाठी र्सवकष प्रयत्न व्हावेत. कारण एड्सबाबत खडान् खडा माहिती समाजातील स्त्री- पुरुषांनी जाणून घेण्याची नितांत गरज आहे. एड्सबाबत माहिती संकलित करा. तिचे वाचन करा व इतरांनाही याची माहिती द्या. दुष्परिणामांबाबत जागृती करा तरच एड्सला आळा बसेल. Read More »![]() सांधेदुखीवर करा मात
ओस्टिओआर्थरायटीस हा आर्थरायटीसचा सर्वसाधारणपणे आढळून येणारा प्रकार आहे, ज्यामध्ये सांधेदुखी आणि सूज येणे असा त्रास होतो. सौम्य स्वरूपाच्या पण नियमितपणे केलेल्या व्यायामाने आणि निरोगी आहार घेतल्याने या आजाराची तीव्रता कमी करता येते. सुजलेले आणि ठणकणारे सांधे घेऊन जगणं कसं असेल याचा फक्त विचार करा. खेळ, नाचणं वगरे सोडूनच द्या पण चालणं, हातापायांना ताण देणं किंवा दात घासण्यासारख्या रोजच्या क्रियादेखील अतिशय मरणप्राय वेदना देणा-या ठरू शकतील. पापण्यांची उघडझाप आणि अन्न चावणं या क्रियाच फक्त आपल्या सांध्यात कळ न येऊ देत करता येण्याजोग्या क्रिया उरतील. संपूर्ण आयुष्यभर अशी वेदना घेऊन जगण्याची कल्पनादेखील करवत नाही. जगभरातील लाखो लोक अशा वेदनादायक वास्तवात जीवन कंठत आहेत. आपल्या शरीरातील सांध्याकडे आपण द्यायला हवं तितकं लक्ष देत नाही आणि त्यांचे महत्त्व आपल्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि झालेली हानी भरून काढण्यापलीकडे गेलेली असते. सांध्यात वेदनादायक जळजळ होत असेल आणि काठिण्य असेल तर त्या आजाराला ओस्टिओआर्थरायटीस (ओए) असं म्हणतात. हा आर्थरायटीसचा सर्वसाधारणपणे आढळून येणारा प्रकार आहे. या आजाराला डीजनरेटिव्ह जॉइंट डीसीज (डीजेडी) असंही म्हणतात. हा आजार वय वाढल्याने आणि सांध्याची हानी अथवा झीज झाल्याने होतो. ओस्टिओआर्थरायटीसमध्ये शरीरातील सांध्यांना आधार देणा-या कार्टिलेजची मोडतोड होते. कार्टिलेजमुळे हाडांच्या टोकांमध्ये अतिशय सहज, अतिशय कमी घर्षणासह हालचाल होऊ शकते. कार्टिलेजमध्ये झालेल्या झीजेमुळे हाडांची उघडी टोके एकमेकांवर घासली जातात आणि हा अनुभव अतिशय वेदनादायक असतो. त्यामुळे सांधे हलवण्यात अडचण येऊ शकते. गुडघे, कंबर आणि हातांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार विकसित देशांमध्ये विकलांगत्वास कारणीभूत असलेल्या पहिल्या दहा आजारांमध्ये ओस्टिओआर्थरायटीसचा क्रमांक येतो. जगभरतील ६० वर्षावरील जवळपास १० टक्के पुरुष आणि १८ टक्केस्त्रियांमध्ये ओस्टिओआर्थरायटीसची लक्षणं आढळून आलेली आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ओस्टिओआर्थरायटीसने पीडित असलेल्या जवळपास ८० टक्के व्यक्तींच्या हालचालींवर मर्यादा येतात. तर २५ टक्के व्यक्तींना नित्यनेमाच्या क्रिया करतानाही त्रास होऊ शकतो. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, एक्स-रे आणि काही प्रकरणांच्या बाबतीत हानी झालेल्या सांध्यांतील सिनोव्हियल द्रावाची चाचणी करून ओस्टिओआर्थरायटीसचं निदान करता येतं. दुर्दैवाने हा आजार बरा होत नाही. या आजाराकरिता उपाययोजना करताना लक्षणांवर भर देऊन आराम देण्यावर आणि सांध्यांची हालचाल चालू ठेवण्यावर भर दिला जातो. वेदनेवर उतारा म्हणून डॉक्टर्स पेनकिलर्स, काही पूरक औषधे आणि जळजळ कमी होण्याकरिता काही औषधे घ्यायला सांगू शकतात. कॉर्टिसोनसारखी स्टिरॉइड्स थेट दुख-या सांध्यांत टोचली जाऊ शकतात. परिस्थिती अगदीच गंभीर असेल तर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. ओस्टिओआर्थरायटीसची प्रक्रिया मंदावू शकेल आणि त्याची वृद्धी थांबवता येईल, अशा उपचार योजनेकरिता संशोधन सुरू आहे. Read More » ![]() | ||||
![]() | ||||
|